सांगलीतील पर्यटकांची गाडी रात्रभर लाडघर समुद्राच्या पाण्यात अडकली
रत्नागिरी
दापोली तालुक्यातील लाडघर येथे फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांची टेम्पो ट्रॅव्हल्स गाडी समुद्रावर वाळूत रूतली होती. मात्र तेव्हाच भरती लागल्याने पाण्याच्या प्रवाहामुळे ही गाडी बाहेर काढणे शक्य न झाल्यानें रविवारी पहाटे ओहोटीनंतर ही गाडी जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात यश आले.
सांगली येथील पर्यटक, लाडघर येथे शनिवारी पर्यटनासाठी आले होते. मात्र ते समुद्रावर गाडी घेवून जात असताना ग्रामस्थांनी त्यांना रोखले. गाडी समुद्रावर घेवून न जाण्याच्या सूचनाही केल्या; परंतु पर्यटक न ऐकता गाडी समुद्रावर घेवून गेले, मात्र काहीवेळाने ही गाडी पुळणीत खोलवर रूतली. सायंकाळी ६.३०च्या सुमारास भरती लागल्याने ही गाडी समुद्राच्या प्रवाहात अडकली. मात्र ती खोल रुतल्याने वाहून न जाता पाण्याच्या प्रवाहात तरंगत होती. ही गाड़ी रविवारी पहाटे पाण्योबाहेर जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आली. जर पाण्याचा प्रवाह मोठा राहिला असता तर गाडीला जलसमाधी मिळाली असती, असे ग्रामस्थ बोलत आहेत. रात्रभर गाडी पाण्यात राहिल्याने मोठे नुकसान झाले. स्थानिकांचे पर्यटक ऐकत नसल्याने गाड्या रूतणे, वाहून जाण्याचे प्रकार घडत आहेत.