संदीप गावडेंनी शिक्षणमंत्र्यांवरील आरोप सिद्ध करून दाखवावेत
अन्यथा राजकीय संन्यास घ्यावा ; केसरकर समर्थकांचे खुलं आव्हान
सावंतवाडी । प्रतिनिधी
भाजपचे माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे हे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यावर बेलगाम आणि तथ्यहीन आरोप करत आहेत . शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यावर केलेले आरोप खपवून घेतले जाणार नाहीत . गावडे यांनी शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांच्यावर केलेले आरोप सिद्ध करून दाखवावे. अन्यथा त्यांनी राजकीय संन्यास घ्यावा असे आव्हान केसरकर समर्थकांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन दिले. संदीप गावडे हे नाहक दीपक केसरकर यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी टीका करताना आपली राजकीय उंची पहावी असा टोलाही केसरकर समर्थकांनी गावडे यांच्यावर हाणला. तसेच गुलाबी नोटांवर निवडून येणाऱ्यांनी आमच्या नेत्यांवर बोलूच नये असा टोला त्यांनी लगावला.. सावंतवाडी येथील आयोजित पत्रकार परिषदेत केसरकर समर्थक बोलत होते. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी ,उपजिल्हाप्रमुख राजू निंबाळकर ,तालुकाध्यक्ष नारायण राणे ,तर महिला अध्यक्ष भारती मोरे ,गजानन नाटेकर ,वेत्ये सरपंच गुणाजी गावडे आदी यावेळी उपस्थित होते
ते म्हणाले, सावंतवाडी मतदारसंघ हा सुसंस्कृत आणि संयमी मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. त्यामुळे कोणावर टीका करून आपली राजकीय उंची वाढत नसून ती उलट कमी होते. आजपर्यंत आम्ही महायुतीचा धर्म पाळलेला आहे. परंतु, भाजपचे काही पदाधिकारी महायुतीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे यापुढे जर आमच्या नेत्यांवर टीका केली तर जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा केसरकर समर्थकांनी दिला. शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी., पदाधिकाऱ्यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीचा धर्म पाळला. नारायण राणे त्यामुळे खासदार म्हणून निवडून आले. आता विधानसभा निवडणूक जवळ आली आहे . या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते ,पदाधिकारी यांनी महायुतीचा धर्म पाळला पाहिजे. तसा निर्णय मुंबई येथे झालेल्या महायुतीच्या समन्वय सभेत घेण्यात आला . यासंदर्भात समन्वय समिती नेमण्यात आली आहे. ही समिती शिक्षण मंत्र्यांवर भाजप पदाधिकाऱ्यांकडून होत असलेल्या आरोपाची दखल घेऊन योग्य तो निर्णय घेणार आहे. मात्र संदीप गावडे केसरकर यांच्याकडून ज्या गावात भाजपचे सरपंच आहेत तेथे अन्याय केला जात असल्याचा आरोप करत आहेत. गावडे यांचा आरोप धादांत खोटा आहे. केसरकर यांनी कधी गाव पातळीवर राजकारण केले नाही. तसेच तळवडे येथील ग्रामपंचायत येथील अपहाराबाबत कोणताही हस्तक्षेप केलेला नाही. त्या अपहाराबाबत केसरकर यांचा दुरान्वये संबंध नाही. केवळ राजकारण म्हणून केसरकर यांना ओढले जात आहे असे केसरकर समर्थकांनी स्पष्ट केले आहे. गेळे येथील कबुलायतदार गावकर जमिनीचा प्रश्न प्रशासन पातळीवर सोडवला जाणार आहे. गेळे ग्रामस्थ आणि केसरकर यांचे सलोख्याचे संबंध आहेत. त्यात कुणीमिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये असा इशाराही यावेळी दिला.दीपक केसरकर यांच्यावर टीका करणाऱ्यांनी आपली राजकीय उंच पहावी. दीपक केसरकर हे शांत व संयमी नेतृत्व आहे. त्यांना सावंतवाडी मतदारसंघात मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे आजपर्यंत ते तीन वेळा सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार झालेत. त्यांनी स्वतःच्या नगरसेवकांना देखील निवडून आणलेत. त्यामुळे गुलाबी नोटांवर निवडून येणाऱ्यांनी यापुढे जर केसरकरांवर टीका केली तर आम्ही ती खपवून घेणार नाही असा इशारा भारती मोरे यांनी दिला आहे.