For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

येरळा पात्रातून पुन्हा वाळू चोरी

04:53 PM Mar 12, 2025 IST | Radhika Patil
येरळा पात्रातून पुन्हा वाळू चोरी
Advertisement

वांगी : 

Advertisement

वांगी आणि शेळकबाव दरम्यानच्या येरळा नदीपात्रातून काही दिवस थांबलेली वाळूचोरी पुनश्च धुमधडाक्यात सुरु झाली आहे. दोन दिवसांपूर्वी रात्रभर यंत्रांच्या सहाय्याने झालेल्या वाळूतस्करीने नदीकाठच्या लोकांची झोप उडविली आहे. तसेच रस्त्यांवर सांडलेल्या वाळूमुळे दुचाकी घसरुन अपघात होत आहेत.

या प्रकारामुळे वाळूतस्कर प्रशासनाला भारी पडत असल्याची चर्चा नदीकाठच्या गावातून झडत आहे. याशिवाय ठराविक गस्तीपथकांच्या ड्युटी दिवशी, शासकीय सुट्टी आणि साप्ताहिक सुट्टीदिवशी तस्कर डबल यंत्रणा राबवून नदीचे लचके तोडत आहेत.

Advertisement

कडेगांव तालुक्यांतील वडियेरायबाग, शिवणी, शेळकबाव, वांगी परिसरांतील अवैध वाळूचोरी रोखण्यासाठी दैनंदिन रात्री नेमलेल्या गस्तीपथकांपैकी क्वचित एखाद्या रात्री चोरी बंद राहत आहे. अन्यथा नदीकाठावरील लोकांना वाळूतस्करी रोजच पाहत बसावे लागत आहे. महसूलने नदीकाठावर काढलेल्या चरी मुजवून तस्करांची वाहने रात्रभर चोरी करतात आणि सकाळी नदीतून बाहेर पडताना पुनश्च चर काढून ठेवतात. अशाप्रकारे महसूलच्या डोळ्यात धुळफेक केली जात आहे. नुतन तहसिलदार अजित शेलार यांची मानसिकता वाळूचोरी पूर्णतः बंद करण्याची आहे. मात्र त्यांचीच यंत्रणा त्यांना साथ देत नसल्याने वाळूतस्करी सुरुच राहत आहे. याचबरोबर महसूलच्या सर्व कर्मचाऱ्यांना शनिवार व रविवार सुट्टी असते. या सर्वांकडेच चारचाकी गाड्या असल्याने भुर्रकन घरी निघून जातात. सुट्टीदिवशी गस्तीपथकात एखादाच कर्मचारी हजर असतो. त्यामुळे नदीकाठच्या गस्तीवर मर्यादा येतात व तस्करांचे फावते. शुक्रवार ते रविवार अखेर तीन रात्री वाळू चोरीचा डबल धमाका असतो.

वास्तविक नदीची अक्षरशः चाळण झाली तरीही महसूलमधील 'भगिरथ' चिडीचूप असल्याने काही दिवसांत नदीतील खडक पूर्णतः उघडे पडून पाणी थांबणे बंद होणार आहे. त्याचे दूरगामी परिणाम येरळाकाठच्या शेतीवर आणि पिण्याच्या पाणीपुरवठा योजनांवर होणार आहेत असे जनतेतून बोलले जात आहे. यासाठी आता महसूलच्या वरीष्ठांनी वाळूचोरी संदर्भात कडक धोरण अवलंबण्याची गरज निर्माण झाली आहे. 

Advertisement
Tags :

.