सना खानच्या इन्स्टाग्रामवरून साडेचार कोटींची फसवणूक
मुंबई
अभिनेत्री सना खानच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चार महिन्यांच्या बालकाला दूर्धर आजार असल्याचे भासवून तिच्या उपचाराच्या नावाखाली साडेचार कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी माटुंगा पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखले केला आहे.
या प्रकरणातील तक्रारदार आरिफ अहमदमन्सूर अहमद शेख (५२) हे माहिम येथीस रहिवासी आहेत. त्यांच्या तक्रारीवरून माटुंगा पोलिसांनी निखत खान, नौफील काझी व पियुष जैन अशा तिघांविरोधात गुन्हा दाखल केला. तक्रारीनुसार आरोपींनी चार महिन्यांच्या बाळावर रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे भासवले होते. त्या बाळाला स्पाइनल मस्कुलर एट्रोपी हा आजर झाला असून त्याच्या वैद्यकिय खर्चासाठी १७ कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचे भासवले. त्यासाठी अभिनेत्री सना खानच्या इन्स्टाग्राम खात्यावरून ११ जानेवारीला नागरिकांना मदतीचे आवाहनही करण्यात आले होते.