For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चारूदत्त गवस यांचे संवादिनी वादन

10:03 AM Apr 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
चारूदत्त गवस यांचे संवादिनी वादन
Advertisement

स्वरमल्हार-सुरेल संवादिनी संवर्धनतर्फे आयोजन : संध्या स्वर बैठकीत निषाद - नौशाद हरलापूर यांचे गायन

Advertisement

बेळगाव : स्वरमल्हार फौंडेशन बेळगाव आणि सुरेल संवादिनी संवर्धन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘प्रात:स्वर’ या पहिल्या सत्रात गोव्याचे युवा कलाकार चाऊदत्त गवस यांचे संवादिनी वादन झाले. त्यांनी राग अहिर भैरवमध्ये विलंबित एकताल व द्रुत एकतालातील आणि द्रुत तीन तालातील गत अतिशय तयारीने सादर केली. ‘लागी कलेजवा कटार’ हे ठुमरीसदृश नाट्यागीत वाजवून आपले वादन संपविले. संवादिनीवर लीलया चालणारी चपळ बोटे हे त्यांच्या वादनाचे वैशिष्ट्या जाणवले. त्यांना तबला साथ गोव्याचे युवा कलाकार भार्गवराम यांनी केली. सकाळचे दुसरे पुष्प पं. अशोक नाडगीर यांनी मीया की तोडी रागाने गुंफले. बडा ख्याल व त्यानंतर छोटा ख्याल ‘लंगर काकरिये जी न मारो’ सादर केल्यानंतर राग देसकार मध्ये ‘झननन झननन बाजे’ हा छोटा ख्याल व शेवटी ‘बोले ना बोल हमसे पियासंग’ या भैरवीमधील बंदिशीने आपले गायन समाप्त केले. त्यांनी समस्त रसिकांना डॉ. गंगुबाई हनगल यांच्या गायनाची आठवण करून दिली. त्यांना डॉ. सुधांशु कुलकर्णी यांनी संवादिनीवर तर तबला साथ भार्गवराम गर्दे यांनी केली.

तानपुरा साथ अशोकजींचे शिष्य शिव हिरेमठ यांनी केली.  सकाळच्या सत्रातील दीपप्रज्वलन पं. अशोक नाडगीर, प्रभाकर शहापूरकर व रवी माने यांच्या हस्ते करण्यात आले. संध्या स्वर या सायंकालीन बैठकीत निषाद व नौशाद हरलापूर या युवा बंधूद्वय कलाकारांच्या दमदार अशा आश्वासक गायकीने झाली. राग गावती बन्सी बजाये हा बडा ख्याल व नौबत बाजे हरी मंदिर में हा छोटा ख्याल सादर केला. त्यानंतर ‘माझे माहेर पंढरी’ हा अभंग, कैसा नाता है हे कबीर भजन सादर करून  मैफलीचे समापन ‘सरण सकल उद्धार असूर कुल संहार’ या भैरवी रागातील देवर नामाने केले. संध्या स्वर या दुसऱ्या सत्रात दीपप्रज्वलन बेंगळूर येथील ख्यातनाम तबला वादक पं. रवी यावगल, प्रभाकर शहापूरकर, निषाद आणि नौशाद यांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन, कलाकारांचा परिचय आणि आभारप्रदर्शन ऐश्वर्या नवलगुंद यांनी व्यक्त केले. कलाकारांना साथ संगत अंगद देसाई (तबला), सारंग कुलकर्णी, (संवादिनी) यांची व तानपुरा साथ क्रांती विचारे हिने केली. कार्यक्रमाला श्रोत्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.

Advertisement

Advertisement
Tags :

.