सॅम्युअलच्या मृत्यूने गोव्यातील कचरा ऐरणीवर
म्हापशातील 22 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थी सॅम्युअल ब्रागांझा या युवकाच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ निर्माण केलेली आहे. आत्महत्या की घातपात या प्रश्नाचा उलगडा अद्याप व्हायचा आहे. सध्यातरी हे प्रकरण आत्महत्या म्हणूनच नोंद आहे. सॅम्युअलने कचऱ्यामुळे उद्भवलेल्या प्रसंगामुळे आत्महत्या केली असेल किंवा याच कारणावरून त्याच्यावर मृत्यू ओढवलेला असेल, त्याला आत्महत्येला प्रवृत्त केलेले असेल तर समाजासाठी ही एक शोकांतीकाच आहे. एक मात्र खरे की, सॅम्युअलच्या मृत्यूमुळे रस्त्यांवरील कचऱ्याची गंभीर समस्या ऐरणीवर आली आहे. आपण नितळ गोव्याकडे जातोय की जीवघेण्या गलिच्छतेकडे याचा विचार सॅम्युअलच्या मृत्यूच्या निमित्ताने व्हायलाच हवा.
क्षुल्लक कारणांवरून तरूणाई आत्महत्यांकडे वळते हे समाजासाठी धोकादायकच आहे. परीक्षांच्या ताणामुळे आत्महत्या घडतात. जीवनातील समस्यांना भिडण्याचे धैर्य नसल्याने तरूण जीवन यात्रा संपवतात. अगदी पालकांनी हट्ट पुरवला नसल्यानेही मुलांना जीवन नकोसे वाटते. अशा घटना आपल्या गोव्यातही घडत आहेत. सहनशक्तीचा अभाव, अपरिपक्वता, सामाजिक स्थिती, समस्यांबाबतचे अज्ञान अशी अनेक कारणे युवकांना नको त्या वळणावर घेऊन जातात. सॅम्युअल ब्रागांझा या युवकाचा मृत्यू अशाच नव्या पिढीतील मानसिक कमजोरीचाच भाग आहे असेच आतापर्यंत वाटत आलेले आहे. त्याच्या मृत्यूने गोव्यात हळहळ व्यक्त झाली. कचऱ्याच्या कारणावरून आत्महत्या हा प्रकार गोव्यात तरी प्रथमच आणि धक्कादायकच. या घटनेने गोव्यातील कचऱ्याच्या गंभीर समस्येकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे हे मात्र खरे. राज्याच्या प्रशासनाने, पालिका आणि पंचायतीनी पुन्हा एकदा कचऱ्याच्या प्रश्नाचा अभ्यास करावा. सॅम्युअलच्या मृत्यूच्या निमित्ताने कुणी मरगळ झटकली तर गोव्याच्या हिताचेच ठरेल.
मध्यरात्री घरातील बाथरूममध्ये सॅम्युअलने गावठी पिस्तुलाने कानशिलात गोळी झाडून आत्महत्या केली असा आतापर्यंतचा निष्कर्ष आहे. मात्र, शवचिकित्सेनंतर त्याच्या मृत्यूला संशयास्पद असे वळणे मिळाले. त्यामुळे रस्त्यावर कचरा फेकताना पकडले म्हणून मानसिक तणावाखाली ज्याने जीवन संपवण्याचे पाऊल उचलले त्या सॅम्युअलच्या मृत्यूमुळे निर्माण झालेली खळबळ आणि निर्माण झालेली हळहळ कुठल्या कुठे हरवली. सॅम्युअलला मृत्यूच्या चोवीस तास आधी मारहाण झाली होती हे शवचिकित्सा अहवालात उघड झाल्यानंतर या प्रकरणाने अनेक संशयास्पद प्रश्न निर्माण केले आहेत. त्याला मारहाण कुणी केली आणि त्याच्याकडे कट्टा कुठून आला हे मुख्य प्रश्न आहेत. त्याच्या आईनेही आपल्या मुलाच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करीत तपासाची मागणी केली. कचरा रस्त्यावर टाकताना ज्याने व्हिडिओ केला तो अडचणीत सापडलाच अन् पोलिसही संशयाच्या घेऱ्यात सापडले आहेत. जोपर्यंत संशयास्पद प्रश्नांची उत्तरे सापडत नाही, तोपर्यंत नजर पोलिसांच्या तपासाकडेच राहणार आहे. पोलिस अधीक्षक विश्वेश कर्पे यांच्याकडून या प्रकरणाचा स्वतंत्र तपास सुरू झालेला आहे. खरे काय अन खोटे काय याचा छडा पुढील पोलीस तपासात लागेलच. तो अधिक धक्कादायकही असू शकतो.
सॅम्युअल ब्रागांझाच्या मृत्यूचा प्रवास कचरा रस्त्यावर टाकताना पकडल्यापासून झाला. दोन बहिणींचा एकच भाऊ आणि आई असे त्याचे कुटुंब. त्याच्या पार्श्वभूमीबाबत चुकीचे काही ऐकू आलेले नाही. आपल्याविरुद्ध पोलीस तक्रार झाल्याने, गुन्हा नोंद झाल्याने आणि समाजमाध्यमांवर बदनामी सहन करावी लागल्याच्या मानसिक धक्क्यातून जर त्याने जीवाचा शेवट केलेला असेल किंवा कचऱ्याच्या प्रकरणातूनच त्याच्यावर मृत्यू ओढवला असेल तर गोव्यासाठी ही शोकांतीकाच आहे. कचऱ्याच्या गंभीर समस्येचाही विचार प्रशासनाला आणि समाजाला गांभीर्याने करावा लागेल. रस्तोरस्ती दिसणारा कचरा बंद व्हावा, कचऱ्याची विल्हेवाट सुव्यवस्थित पध्दतीने लावली जावी, गोव्यासारख्या सुशिक्षित समाजात कचऱ्याबाबत बेशिस्त दिसता कामा नये असे मानणारे लोक आहेत म्हणूनच रागाच्या भरात किंवा सुधारणा आणि असे प्रकार बंद व्हावेत या भावनेने व्हिडिओ काढणारे लोकही आहेत. रस्त्यावर कचरा टाकतानाचे व्हिडिओ या यापूर्वीही समाजमाध्यमांवर झळकले आहेत. मात्र, काही जण मनाला लावून घेणारे असतात. आपल्या व्हिडिओमुळे सॅम्युअल आत्महत्या करेल असा विचार व्हिडियो काढणाऱ्याच्या मनात येणे शक्यच नाही. मात्र, समाजमाध्यमाने इतरांच्या भावभावनांचा, इज्जतीचा, सन्मानाचा विचार करावा की नाही, जबाबदारीने वागावे की अनिर्बंधपणे वागावे याचाही विचार करण्यासाठी सॅम्युअलचा मृत्यू हे उदाहरण पुरेसे आहे.
कचरा समस्या ही केवळ गोव्याची समस्या नाही, ती देशाचीच आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतून स्वच्छ भारत अभियान उदयास आले. मात्र खरेच भारत स्वच्छ झाला का याचे संशोधन करण्याचीही गरज नाही. स्वच्छतेबाबत जागृती दिसत असली तरी अस्वच्छता थांबलेली नाही. आपले गोवा हे देशातील छोटेसे आणि पर्यटन केंद्रीत राज्य असल्याने गोव्यात तरी रस्तोरस्ती कचरा दिसता कामा नये. मात्र, गोव्यातील बहुतेक महामार्ग आणि गावातील रस्तेसुध्दा कचऱ्याच्या पसाऱ्याने सजलेले दिसतात. पणजीसह गोव्यातील चौदा पालिका आणि संबंध गोव्यातील पंचायती कचऱ्याच्या उपद्रवापासून मुक्त नाहीत. पूर्वी पालिका व पंचायत क्षेत्रात ठिकठिकाणी कचरा कुंड्या असायच्या. त्या गलिच्छतेचा उबग आल्याने घरोघरी कचरा गोळा करण्याची पध्दत सुरू झाली. तरीही उघड्यावरील गलिच्छता थांबलेली नाही. कारण कचरा गोळा करण्याच्या पध्दतीत अनेक त्रुटीही आहेत. त्यामुळेच लोक त्रस्त होतात आणि रात्री-अपरात्री उघडपणे कचरा रस्त्यावर फेकतात.
रस्त्यावर कचरा फेकणाऱ्यांची संख्या मोठी आहे आणि यात सुशिक्षतांचाही समावेश आहे. स्वच्छता राखण्यास लोकांना मदत करणारी शासकीय यंत्रणाही सक्षम नाही. या विषयात पालिका आणि पंचायतीही अपात्र ठरतात. कचऱ्यामुळे गोव्यातील शहरी भागात आणि ग्रामीण भागातही वाद वाढत आहेत. सॅम्युअलच्या मृत्यूनंतर तरी लोक रस्त्यांवर कचरा का फेकतात, त्यांना रस्त्यावर कचरा फेकणे का भाग पडते याची कारणे शोधावीत आणि उपाययोजनाही शोधाव्यात.
अनिलकुमार शिंदे