For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सॅम्युअल मृत्यू तपास आता कुटुंबीयांकडे

04:14 PM Jun 11, 2026 IST | Tarun Bharat Portal
सॅम्युअल मृत्यू तपास आता कुटुंबीयांकडे
Advertisement

म्हापसा : गावसावाडा, म्हापसा येथील सॅम्युअल गार्विन दी ब्रागांझा याला मारहाण सोडाच आम्ही हातही लावलेला नाही, असा दावा म्हापसा पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जबाबात केला आहे. पोलिसस्थानकातील सीसीटीव्ही फुटेजमध्येही पोलिस धमकावत किंवा मारहाण करत असल्याचे आढळलेले नाही. त्यामुळे पोलिस तपासाची चक्रे आता दुसऱ्या बाजूने वळू लागली असून तपास सॅम्युअलच्या कुटुंबीयांकडे वळला आहे. जो हल्ला झाला तो घरात की घराबाहेर? या दिशेने पोलिस आता तपास करणार असून त्यादिवशी मयताच्या घरी कोण कोण होते याची कसून चौकशी होईल. पोलिस अधीक्षक विश्वेश कर्पे यांनी घटनेच्या दिवशी ड्युटीवर असलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करून जबाब नोंद केला आहे.

Advertisement

पोलिसांनी आरोप फेटाळले

चौकशीत पोलिसांनी सॅम्युअलला मारहाण केल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. आम्ही त्याला हात लावला नाही किंवा धमकीही दिली नाही. गुन्हा नोंदवल्यानंतर कायद्यानुसार त्याला नोटीस दिली. नोटिसीत दुसऱ्या दिवशी स्थानकात हजर राहण्याची अटही घातली होती, असा जबाब पोलिसांनी दिला आहे.

Advertisement

पोलिसांनी हात उगारल्याचा पुरावा नाही

पोलिस स्थानकातील जप्त केलेल्या सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी अधीक्षक कर्पे यांनी केली. त्यात संशयास्पद काहीच सापडले नाही. स्टेशन हाऊस अधिकारी कक्ष, पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक केविन व ज्या खोल्यांमध्ये सॅम्युअल पोलिसांसमवेत गेला होता, तेथील फुटेज तपासण्यात आली. मात्र त्यात पोलिसांनी हात उगारल्याचा प्रकार आढळलेला नाही.

 त्या दुचाकीच्या मालक आई

4 जून रोजी कचरा फेकण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर व्हिडिओतील दुचाकीच्या क्रमांकावरून दुचाकी मालकाचा पत्ता पोलिसांनी शोधला. दुचाकीच्या मालक सॅम्युअलची आई जेनेव्हिव्ह ब्रागांझा होत्या. त्यांना चौकशीसाठी पाचारण केले. त्या दुपारी 4 च्या सुमारास आपल्या मुलीसमवेत आल्या. त्यांनी पोलिसांच्या सूचनेनुसार सॅम्युअललाही पोलिसस्थानकात बोलावून घेतले. तो 4.45 च्या दरम्यान स्थानकात आला. चौकशीनंतर त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवला व नोटीस दिली.

बाहेर पडल्यानंतर सॅम्युअर गेला कुठे?

रात्री 9.20 च्या सुमारास नोटीस घेऊन तो आई व बहिणीसोबत स्थानकातून बाहेर पडला. रात्री 12.49 च्या सुमारास त्याला मृतावस्थेत म्हापसा जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. असा घटनाक्रम पोलिसांनी जबाबात नोंदवला आहे.

डोळ्यावरील दुखापत स्थानकातून गेल्यानंतरची

गुन्हा नोंद झाल्यावर पोलिसस्थानकातून तो रात्री 9.20 वाजता आई व बहिणीसोबत बाहेर पडला होता. त्याच्या डाळ्याला गंभीर दुखापत झाल्याचे शवचिकित्सेतून स्पष्ट झाले आहे. ती दुखापत पोलिसस्थानकातून बाहेर पडल्यावर झाल्याचा संशय पोलिसांना आहे. घटनेच्या रात्री 9.20 ते 12.30 यावेळेत सॅम्युअल घरीच होता की कुठे गेला होता, याचा तपास पोलिस करीत आहेत.

Advertisement
Tags :

.