सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे बाजारमूल्य 1 ट्रिलियन डॉलर्सच्या घरात
अशी कामगिरी करणारी सॅमसंग आशियातील दुसरी कंपनी ठरली : एआय चिपच्या वाढत्या मागणीचा परिणाम
वृत्तसंस्था, मुंबई
दक्षिण कोरियाची दिग्गज कंपनी सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे बाजारमूल्य 1 ट्रिलियन डॉलर्स म्हणजेच सुमारे 95.08 लाख कोटी रुपयांच्या पार गेले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) चिप्सच्या वाढत्या मागणीमुळे, जगातील सर्वात मोठ्या मेमरी चिप निर्मात्याच्या शेअर्समध्ये गेल्या वर्षभरात जवळपास 400 टक्क्यांची वाढ झाली आहे.
बुधवारी झालेल्या व्यवहारादरम्यान सॅमसंगच्या शेअर्समध्ये 15 टक्क्यांची वाढ झाली. यासह, तैवानच्या टीएसएमसीनंतर हे स्थान मिळवणारी सॅमसंग ही दुसरी आशियाई कंपनी ठरली आहे.
कोरियन बाजारात तेजी, कोस्पी निर्देशांक 7,400 च्या वर सॅमसंगच्या शेअर्समधील वाढ दक्षिण कोरियाचा बेंचमार्क निर्देशांक कोस्पीमध्येही दिसून आली, जो 7,400 च्या पातळीच्या वर गेला. सॅमसंगसोबतच एसके हायनिक्स आणि टीएसएमसी सारख्या कंपन्या आशियाला जागतिक एआय इकोसिस्टममध्ये एक प्रमुख केंद्र म्हणून स्थापित करत आहेत.
चिप निर्मितीमधील वर्चस्व आणि गुंतवणूकदारांचा विश्वास सेमीकंडक्टर निर्मितीमधील वर्चस्व आणि डेटा इन्फ्रास्ट्रक्चरमधील वाढत्या गुंतवणुकीमुळे गुंतवणूकदार चिप उत्पादकांकडे आकर्षित झाले आहेत. या ट्रेंडमुळे, तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअर्समध्येही मोठी तेजी आली आहे. गेल्या एका महिन्यात, एसके हायनिक्सच्या शेअर्समध्ये 81 टक्केपेक्षा जास्त आणि टीएसएमसीच्या शेअर्समध्ये 21.77 टक्के वाढ नोंदवली गेली आहे.
सॅमसंगच्या नफ्यात वाढ
सॅमसंगच्या नफ्यात तब्बल 48 पटींची वाढ यापूर्वी, सॅमसंगच्या सेमीकंडक्टर विभागाच्या नफ्यात मार्च तिमाहीत वार्षिक तुलनेत 48 पटींची मोठी वाढ दिसून आली होती. एआय-आधारित डेटा सेंटर्सकडून मिळालेली मोठी मागणी आणि सुधारित मार्जिनमुळे कंपनीच्या कमाईने नवीन उंची गाठली आहे.
अॅपलसोबत संभाव्य भागीदारीची चर्चा
मिळालेल्या माहितीनुसार, तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी अॅपल इंकने अमेरिकेत आपल्या उपकरणांसाठी प्रोसेसर तयार करण्याकरिता सॅमसंगसोबत प्राथमिक चर्चा सुरू केली आहे. जर हा करार निश्चित झाला, तर ऍपलला टीएसएमसीवरील आपले दीर्घकालीन अवलंबित्व कमी करण्याची एक मोठी संधी मिळेल.