Kolhapur Crime News: ड्रायव्हरच निघाला भेदी, चाकूचा धाक दाखवून लुटल्याचा 12 तासांत छडा
कोल्हापुरात स्थानिक गुन्हे अन्वेषणची कामगिरी, दोघांना अटक
कोल्हापूर : सम्राटनगर येथे भरदिवसा घरामध्ये घुसून वृद्धाच्या गळ्यास चाकू लावून चोरट्यांनी अवघ्या 15 मिनीटात धाडसी जबरी चोरी केली होती. या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने 12 तासामध्ये छडा लावला. सहा वर्षापासून असलेल्या चालकानेच ही घरफोडी केल्याचे उघड झाले आहे.
प्रकाश दत्तात्रय चौगुले (वय 38 रा. हंचनाळ ता. चिकोडी जि. बेळगांव), अमित विश्वनाथ शिंदे (वय 25 रा. यादवनगर, डवरी वसाहत) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून 44 तोळे सोन्याचे दागिने, रोख 75 हजार, अलिशान कार, दुचाकी असा सुमारे 50 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी राजू जयकुमार पाटील सम्राटनगर येथील गोविंदराव हौसिंग सोसायटीमध्ये पत्नी, मुलगा आणि सून असे चौघेजण राहतात. गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे ते कंपनीत गेले होते. पाटील यांचे व्याही (सुनेचे वडील) शीतल सौंदते (वय 83) हे 15 दिवसांपासून राजू पाटील यांच्याकडे राहण्यास आले आहेत. गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ते एकटेच बंगल्यात होते.
याचवेळी दोन चोरट्यांनी बंगल्याचा मुख्य दरवाजातून बंगल्या आवारात प्रवेश केला. बंगल्याच्या मागील बाजूस असणारे दार किल्लीच्या सहाय्याने घडून दोन चोरटे आत शिरले. त्यातील एकाने सौंदते यांच्या गळ्याला चाकू लावला, तर दुसरा चोरटा थेट वरच्या मजल्यावर गेला. कपाटांमधील साहित्य विस्कटून कपाटातील दागिन्यांचे तीन डिजिटल लॉकरच एका प्रवासी बॅगमध्ये भरुन पलायन केले होते.
या घटनेनंतर राजारामपुरी पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरु केले. या गुह्याचा तपास करत असताना पोलीस अंमलदार सुरेश पाटील यांना हा गुन्हा प्रकाश चौगुले याने केला असून, तो साथीदारासह लक्ष्मी टेकडी येथे येणार असल्याची माहिती समोर आली.
यानुसार पोलिसांनी शुक्रवारी पहाटे सापळा रचून प्रकाश चौगुले व त्याच्या साथीदारास ताब्यात घेतले. यावेळी त्याच्या वाहनाची तपासणी केली असता, वाहनाच्या डिकीमध्ये तीन लहान लॉकर, दोन बॅगा, चाकु, रेनकोट, हेल्मेट मिळून आले. याबाबत विचारणा केली असता, त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने चोरीच्या गुह्याची कबूली दिली.
पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस अंमलदार सुरेश पाटील, वैभव पाटील, प्रदीप पाटील, रुपेश माने, अरविंद पाटील, संजय पडवळ, कृष्णात पिंगळे, अमित सर्जे, सचिन बेंडखळे यांनी ही कारवाई केली.