कोकण विभागीय पतसंस्था फेडरेशनच्या संचालकपदी ॲड. समीर वंजारी यांची निवड; वैश्य समाज पतसंस्थेतर्फे विशेष गौरव
यावेळी ॲड. समीर वंजारी म्हणाले की, वैश्य समाज पतसंस्थेच्या माध्यमातून गेल्या अडीच वर्षांपासून सहकार क्षेत्रात कार्यरत आहे. समाजातील तळागाळातील सर्वसामान्य, गोरगरीब जनतेचा आर्थिक कणा मजबूत व्हावा आणि त्यांच्या घरात समृद्धी यावी, या उद्देशाने पतसंस्थेच्या माध्यमातून काम केले जात आहे. कोकण विभागीय पतसंस्था फेडरेशनच्या संचालकपदासाठी सर्वानुमते माझे नाव सुचविण्यात आले, याबद्दल मी मार्गदर्शक आणि संचालक मंडळाचा मनापासून ऋणी आहे, असे त्यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पतसंस्थांच्या समस्या व अडचणी सोडविण्यासाठी, तसेच कर्मचारी, ठेवीदार, कर्जदार आणि पिग्मी एजंट यांच्या हितासाठी फेडरेशनच्या माध्यमातून काम करण्याचा प्रयत्न राहील. पतसंस्था आणि फेडरेशन यांच्यातील दुवा म्हणून काम करताना सर्वांना विश्वासात घेऊन दिलेली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडणार आहे. सहकाराची चळवळ गावागावांत आणि घराघरांत अधिक गतिमान करण्याचा प्रयत्न राहील, असे ॲड. वंजारी यांनी स्पष्ट केले.
या सहकार क्षेत्रातील प्रवासात डी.डी.आर. सोपान शिंदे आणि सिंधुदुर्ग जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष सुनील राऊळ यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरल्याचेही त्यांनी नमूद केले.
वैश्य समाज पतसंस्थेचे अध्यक्ष बाळा वळंजू यांनी ॲड. वंजारी हे हुशार, अभ्यासू व्यक्तिमत्त्व असून, त्यांनी सहकार क्षेत्रात अल्पावधीत चांगले काम केले आहे. त्यांची फेडरेशनच्या संचालकपदी निवड होणे ही वैश्य समाज पतसंस्थेसाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपाध्यक्ष चंद्रशेखर कुशे, माजी अध्यक्ष सुनील कोरगावकर, दिलीप पारकर, बाळा पारकर, उमेश वाळके, सुनील डुबळे, संजय पेडणेकर, रश्मी माणगावकर, अनिता रेवडेकर, तज्ज्ञ संचालक अरविंद शिरसाट, श्री. मसुरकर, व्यवस्थापक ईश्वरदास पावसकर, सहाय्यक श्रीमती पिळणकर आदी उपस्थित होते.
काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष आबा दळवी, माजी जिल्हाध्यक्ष ॲड. दिलीप नार्वेकर, माजी नगराध्यक्ष पल्लवी केसरकर, जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. परिमल नाईक, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर, नगरसेवक देव्या सूर्याजी, काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी, काँग्रेस नेते राजू मसुरकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय मालवणकर यांच्यासह राजकीय, सामाजिक, सहकार, वकिली क्षेत्रातील मान्यवर आणि मित्रपरिवाराने ॲड. वंजारी यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
