अरविंद श्रीवास्तव यांची महसूल, समीर सिन्हा नागरी विमान वाहतूक प्रमुख
अरविंद श्रीवास्तव यांची महसूल सचिवपदी नियुक्ती, समीर सिन्हा नागरी विमान वाहतूक प्रमुख
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्र सरकारने शुक्रवारी प्रशासकीय अधिकारी पातळीवर मोठे फेरबदल केले. नव्या नियुक्त्यांनुसार, अरविंद श्रीवास्तव यांना महसूल सचिव आणि समीर सिन्हा यांना नागरी विमान वाहतूक प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. 1994 च्या कर्नाटक केडरचे भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) अधिकारी असलेले श्रीवास्तव सध्या पंतप्रधान कार्यालयात अतिरिक्त सचिव म्हणून कार्यरत आहेत. अरविंद श्रीवास्तव यांचे आसाम-मेघालय कॅडरमधील बॅचमेट, समीर सिन्हा यांची नागरी विमान वाहतूक सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
वुमलुनमुंग वुलनम यांच्या जागी समीर सिन्हा यांची वर्णी लागल्यामुळे आता वुलनम यांना अर्थ विभागाचे सचिव म्हणून पदभार देण्यात आला आहे. अर्थ मंत्रालयात असलेल्या मनोज गोयल यांना मंत्रिमंडळ सचिवालयात सचिव (समन्वय) म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. मध्यप्रदेश कॅडरचे 1994 च्या बॅचचे आयएएस अधिकारी विवेक अग्रवाल यांची संस्कृती मंत्रालयात सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अग्रवाल सध्या महसूल विभागात अतिरिक्त सचिव आहेत. त्यांच्याकडे फायनान्शियल इंटेलिजेंस युनिट-इंडियाचे संचालक हे पदही आहे.
प्रशासकीय अधिकारी फेरबदलाचा भाग म्हणून केंद्र सरकारच्या प्रमुख विभागांमध्ये इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय, कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने दोन अधिकाऱ्यांना त्यांच्या सध्याच्या पदांवर राहून विशेष सचिव स्तरावर पदोन्नती देण्यास मान्यता दिली आहे. ही पदोन्नती वैयक्तिक आधारावर देण्यात आली असून त्यासाठी त्यांच्या सध्याच्या पदांमध्ये तात्पुरती सुधारणा करण्यात आली आहे