For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सांबरा विमानतळ नव्या टर्मिनलचे काम प्रगतीपथावर

12:43 PM Jun 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
सांबरा विमानतळ नव्या टर्मिनलचे काम प्रगतीपथावर
Advertisement

पुढील वर्षीच्या शेवटापर्यंत जाणार पूर्णत्वाला : अत्याधुनिक सेवा दिल्या जाणार

Advertisement

बेळगाव : बेळगावच्या सांबरा विमानतळावर सुसज्ज अशा नव्या टर्मिनलचे काम प्रगतीपथावर आहे. डिसेंबर 2026 पर्यंत टर्मिनलचे काम पूर्ण होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. 322 कोटी रुपये खर्चून 19 हजार 600 चौरस मीटर अशा विस्तीर्ण जागेत नवे टर्मिनल बिल्डींग उभे रहात असल्याने बेळगावच्या प्रवाशांना आता विमानसेवेसाठी पुरेशी जागा उपलब्ध होणार आहे. सांबरा गावच्या परिसरामध्ये 755 एकर जागेत विमानतळ आहे. एकाचवेळी आठ विमाने हाताळण्याची क्षमता बेळगावच्या विमानतळामध्ये आहे. एकूण सहा ठिकाणी पार्किंगची सुविधा करण्यात आली आहे. दिवसाला 640 प्रवासी हाताळण्याची क्षमता सध्याच्या टर्मिनल बिल्डींगमध्ये आहे. परंतु, ही जागा भविष्यात कमी पडण्याची शक्यता असल्यामुळे नवे टर्मिनल उभे केले जात आहे. भविष्यात जुन्या टर्मिनलचा वापर एअर कार्गोसाठी करण्याचा विचार विमानतळ प्राधिकरणाकडून सुरू आहे.

आठवडाभरापूर्वी खासदार जगदीश शेट्टर यांनी टर्मिनल बिल्डींगच्या कामाची पाहणी केली. यावेळी डिसेंबर 2026 पर्यंत टर्मिनलचे काम पूर्ण होईल, अशी माहिती देण्यात आली. नव्या टर्मिनल बिल्डींगमध्ये अत्याधुनिक सेवा दिल्या जाणार आहेत. मुंबई, बेंगळूर व गोवा विमानतळाच्या धर्तीवर येथे चार एअरोब्रिज, आठ एक्स्केलेटर (सरकते जिने), एका लिफ्टची व्यवस्था करण्यात येणार आहे. एकाच वेळी नऊ विमाने पार्किंग करण्याची व्यवस्था या ठिकाणी केली जाणार आहे. 32 ठिकाणी चेक काऊंटर सुरू केले जाणार असल्याने प्रवाशांना विमानतळामध्ये प्रवेश करणे सोयीचे होणार आहे. बेळगाव-दिल्ली या बोईंग विमानाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. दररोज 200 ते 250 प्रवाशी विमानाने ये-जा करत असल्याने भविष्यात मोठी विमाने बेळगावला उतरण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर बेळगावला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा द्या, अशीही मागणी नागरिकांमधून होत आहे. या सर्वाचा विचार करून अत्याधुनिक टर्मिनल बिल्डींग उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.