शाहू खासबागेतील कुस्ती वैभवाला येणार झळाळी
संभाजीराजे छत्रपती, पालकमंत्री मुश्रीफ यांचा पुढाकार : प्रतीवर्षी कुस्ती फड आयोजनासाठी मल्ल, संस्थाही प्रयत्न करणार
संग्राम काटकर कोल्हापूर
गतवर्षी श्रीमंत शाहू छत्रपतींच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त आणि यंदा गेल्या रविवारी माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मल्लांच्या झालेल्या कुस्तींनी कोल्हापुरी कुस्तीला बळ मिळाले. संभाजीराजे छत्रपतींनी जन्मदिनाच्या औचित्यावर दरवर्षी स्वराज्य केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले, असे सांगत शाहू खासबाग मैदानावर उपस्थितांची मने जिंकली. पालकमंत्री मुश्रीफ यांनीही गोकुळतर्फे शाहू खासबागेतूनच कुस्ती मैदान भरवले जाईल, असे अभिवचन दिले. त्यामुळे शाहू खासबागचा मेटेनन्स राखला जाईलच, शिवाय मल्लांना कुस्ती मैदानातील मल्लयुद्धासाठी सदैव अलर्ट रहावे लागणार आहे.
येत्या 24 फेब्रुवारीला शाहू विजयी गंगावेश तालमीचे पैलवान संग्राम कांबळे काही वस्तादांसोबत घेऊन शाहू खासबागेत ‘खासबाग केसरी’ कुस्ती मैदान भरवणार आहेत. लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू प्रतिष्ठान व मावळा कोल्हापूर 9 मार्चला शाहू खासबागेतच 14 वर्षाखालील मुला-मुलींचे कुस्तीचे मैदान आयोजित करणार आहे. भविष्यात मैदानांना स्पॉन्सर मिळत राहिल्यास दरवर्षी कुस्ती मैदान भरवू, असे आयोजकांचे सांगणे आहे. कुस्तीच्या भवितव्यांच्या दृष्टीने हे महत्वपूर्ण पाऊलच म्हणावे लागेल.
राजर्षी शाहू महाराजांनी रोमच्या धर्तीवर 1905 ते 1912 या काळात खासबाग मैदान बांधले. मैदानातील लालमातीत देशभरातील मल्लांच्या कुस्ती लावण्याची परंपरा सुऊ आहे. त्यामुळे इमाम बक्ष, देवाप्पा धनगर, ऑलिम्पिकवीर दिनकरराव शिंदे, गणपतराव शिंदे, बाबु बिरेंसह गोगा पंजाबी, सादिक पंजाबी, हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे, माऊती माने, गणपतराव आंदळकर, हरिश्चंद्र बिराजदार, विष्णू सावर्डे, चंबा मुत्नाळ, कुस्तीसम्राट युवराज पाटील, महाबली सतपाल, महान भारत केसरी दादू चौगले, ऑलिम्पिकवीर बंडा पाटील-रेठरेकर, डबल महाराष्ट्र केसरी लक्ष्मण वडार, महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर, यांच्यासह शेकडो बलदंड मल्लांच्या कुस्ती कोल्हापुरातील कुस्ती शौकिनांना पाहण्याचे भाग्य लाभले.
राजाश्रय मिळालेल्या कुस्तीला लोकाश्रयासाठी ठेकेदार पद्धतीने कुस्ती मैदाने भरवली जात होती. ठेकेदार मम्हुलाल वस्ताद, माळकर वस्ताद, बाबुराव महाडिक वस्ताद, शिद्राय पाटील (बेळगाव) यांच्यासह पुणे, मुंबईतील कुस्ती जाणकारांकडून सतत कुस्ती मैदाने भरवली. या मैदानांना होणाऱ्या गर्दीमुळे कोल्हापूरची कुस्ती देशाच्या पटलावर आली. ठेकेदारांच्या निधनानंतर ठेकेदारे पद्धतीने कुस्ती मैदानाला थोडासा ब्रेक लागला. 1990 नंतर तर शाहू खासबाग मैदानातील कुस्ती मैदानांची संख्या घटू लागली. मात्र आज ना उद्या कुस्ती मैदाने होतील, या अपेक्षेने खेड्या-पाड्यातील पालक मंडळी विविध तालमींमध्ये मुलांना मल्लविद्येसाठी तालमीत पाठवत होते. त्यामुळे सर्वच तालमींमधील मल्लांची संख्या वाढतच राहिली. 2000 नंतर जाणवण्याइतपत शाहू खासबागमधील कुस्ती मैदानांची संख्या घटली. 15 वर्षात जिल्हा प्रशासन (कोल्हापूर केसरी), गोकुळ, लोकनेते सदाशिवराव मंडलिक ट्रस्ट, डॉ. डी. वाय. पाटील ट्रस्ट, महापालिकेने कुस्ती मैदाने भरवली. पण मैदान भरवण्यात सात्यत्य ठेवले नाही. त्यामुळे मल्लांना गावागावच्या यात्रांमध्ये होणाऱ्या कुस्तीफडात त्यांना श•t मारावा लागला.
नंतरच्या काळात कुस्तीअभावी शाहू खासबाग मैदान ओस पडले. त्याची दखल घेऊन माध्यमांनी कुस्ती मैदान होणार की नाही, हा प्रश्न उचलून धरला. कोल्हापुरी कुस्तीच्या अस्तित्वालाच धोका पोहोचल्याची प्रतिक्रियाही कुस्तीतील जाणकारांमधून उमटली. या दखल घेऊन साखर कारखाने, नेतेमंडळी, दुध संस्थांनी शाहू खासबागेत कुस्ती मैदाने भरवण्यास सुऊवात केली. त्यानंतर अधून-मधून का होईना, एखादे कुस्ती मैदान शाहू खासबागेत होत राहिले. संभाजीराजे छत्रपती यांनी शाहू खासबाग मैदानात दरवर्षी कुस्ती मैदान आयोजित कऊ, अशी घोषणा केली आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीही दोन-तीन मैदाने भरवू असे अभिवचन दिले आहे. संस्था, संघटना, नेतेमंडळीनी दरवर्षी कुस्ती मैदान भरवण्यासाठी पुढे यावे, अशी आवाहन जाणकाराकडून केले जात आहे. त्याला प्रतिसाद मिळाल्यास लयाला गेलेला सुवर्णकाळ पुन्हा बहरून येणार आहे.
कुस्ती आयोजकांची लवकरच भेट घेणार
गेल्या 15 वर्षात जिल्हा प्रशासन (कोल्हापूर केसरी), गोकुळ, लोकनेते सदाशिवराव मंडलिक ट्रस्ट, डॉ.डी. वाय. पाटील ट्रस्ट, महापालिका, मावळा कोल्हापूर यांच्याकडून कुस्ती मैदाने भरवली जात होती. पण त्यात सातत्य नसल्याने मल्लांना स्थानिकांबरोबरच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मल्लांशी मल्लयुद्धाची संधीच मिळत नव्हती. हे कुठे तरी थांबावे म्हणून लवकरच तालीम संघाचे पदाधिकारी आणि कुस्ती आयोजकांची भेट घेऊन दरवर्षी कुस्ती मैदान आयोजनाची गळ घालणार आहे.
अशोक पोवार, सचिव, कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघ