For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

संविधान मोडून काढण्यासाठी ‘चार सौ पार‘ची धडपड : संभाजीराजे छत्रपती

12:57 PM Apr 22, 2024 IST | Abhijeet Khandekar
संविधान मोडून काढण्यासाठी ‘चार सौ पार‘ची धडपड   संभाजीराजे छत्रपती
Advertisement

मलिग्रे येथे महाविकास आघाडीची प्रचारसभा; शाहू छत्रपतींना विजयी करण्याचा निर्धार

आजरा : प्रतिनिधी

सध्या भाजपाची 400 पेक्षा जास्त खासदार निवडून आणण्यासाठी सुरू असलेली धडपड म्हणजे केवळ संविधान मोडून काढण्याचे षडयंत्र आहे. हा षडयंत्राचा डाव हाणून पाडण्यासाठी व छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू, महात्मा जोतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी शाहू छत्रपती यांना विजयी करा, असे आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केले.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू यांच्या प्रचारार्थ आयोजित संपर्क दौर्यात मलिग्रे, ता. आजरा येथे ते बोलत होते.

Advertisement

संभाजीराजे म्हणाले, महापुरुषांचे विचार संपुष्टात आणून ऐनवेळी संसदेच्या सर्वोच्च सभागृहांमध्ये सर्वसामान्यांच्या आवाक्यापलीकडचे विषय मांडून मुख्य ज्वलंत प्रश्नांना बगल देण्याचे काम भाजपच्या नेतृत्त्वाखालील सरकारकडून सुरू आहे. अशावेळी सर्वसामान्यांनी सतर्क राहण्याची गरज आहे. अन्यथा याची फार मोठी किंमत भविष्यात मोजावी लागेल.

डॉ. नंदाताई बाभूळकर म्हणाल्या, शाहू छत्रपतींसारखा आश्वासक व सुसंस्कृत चेहरा संसदेत जाण्याची गरज आहे. ज्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सर्व सामान्यांच्या हिताच्या अनेक योजना राबविल्या, त्यांच्या जीवनामध्ये समृद्धी आणली अशा राजर्षी शाहू महाराजांच्या वारसांना विकास कामाबद्दल सांगण्याचीही गरज भासणार नाही.

Advertisement

गोकुळच्या संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर म्हणाल्या, गतवेळी संभाजीराजांना कोळींद्रे जिल्हा परिषद मतदार संघातून मताधिक्य दिले होते. यावेळी आपण गतवेळच्या मताधिक्यापेक्षा दुपटीने मताधिक्य निश्चितच देवू.

कॉ. संपत देसाई, कॉ. अजय देशमुख, रामराजे कुपेकर, आजरा कारखाना संचालक अशोक तर्डेकर यांनीही ठिकठिकाणी मार्गदर्शन करून शाहू छत्रपतींना निवडून आणण्याचे आवाहन केले. यावेळी मुकुंदराव देसाई, अभिषेक शिंपी, नौशाद बुड्ढेखान, अप्पी पाटील, रचना होलम, राजू होलम, राजू देसाई, अशोक पोवार, विक्रम पटेकर, रवी भाटले, युवराज पोवार, वंचितचे संतोष मासाळे, विक्रम देसाई यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

केवळ सरकारवर अवलंबून राहू नका
कोळींद्रे जिल्हा परिषदेतील धरणांच्या लाभक्षेत्रातून वगळलेल्या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी पाणी परिषद घ्यावी. जेव्हा आम्ही पाण्यासाठी संघर्ष करू तेव्हा आपण आमच्या सोबत रहा, असे आवाहन कॉ. संपत देसाई यांनी संभाजीराजेंना केले. हाच धागा पकडत संभाजीराजे यांनी पाणी देण्याच्या पार्श्वभूमीवर सरकारवर अवलंबून न राहता एक कृती आराखडा तयार करून सरकारलाच आपण सक्षम पर्याय देऊया, यासाठी आपण अग्रभागी असू असे सांगितले.

Advertisement
Tags :

.