महाविकास आघाडी पुरस्कृत ‘स्वराज्य‘चे संभाजीराजे उमेदवार ?
दोन दिवसात अंतिम निर्णय शक्य : दिल्लीतील बैठकीत चर्चा , संभाजीराजे छत्रपतीची सावध भूमिका
कोल्हापूर : प्रतिनिधी
कोल्हापूर लोकसभेसाठी महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार? याची उत्सुकता ताणली आहे. यापार्श्वभूमीवर दिल्ली येथे महाविकासच्या नेत्यांची बैठक झाली. याबैठकीत संभाजीराजे छत्रपती यांची स्वराज्य संघटना महाविकास आघाडीचे घटक पक्ष म्हणून येईल, तसेच कोल्हापुरातून संभाजीराजे लोकसभेचे उमेदवार असावेत, अशी चर्चा झाल्याचे सुत्रांनी सांगितले. यावर संभाजीराजे यांनी सावध भूमिका घेत, स्वराज्य पक्ष असताना कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही, राज्यातील जनतेच्या विश्वासावर महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचे भविष्य हे‘स्वराज्य’ असेल या ध्येयाने आपली व स्वराज्य पक्ष संघटनेची वाटचाल सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
महाविकास आघाडीकडून सक्षम आणि प्रभावी चेहरा म्हणून राज्यसभेचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांना कोल्हापूरच्या रिंगणात उतरवण्याची मनिषा काही स्थानिक नेत्यांची आहे. मात्र संभाजीराजे छत्रपती यांनी महाविकास आघाडीतील तीन घटक पक्षांपैकी एका पक्षात प्रवेश करण्याची अट घातल्याने गुंता वाढला आहे. येत्या दोन दिवसात याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. मराठा आंदोलनामुळे सामाजिक परिस्थिती बदलत असतानाच संभाजीराजे छत्रपती यांच्यासारखा मराठा चेहरा महाविकास आघाडीमध्ये सहभागी झाल्यास त्याचा सकारात्मक परिणाम महाविकास आघाडीला राज्यभरात दिसून येईल, अशी कॉंग्रेस हायकमांडसह महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे.
संभाजीराजे यांचा एक्सवर खुलासा
छत्रपती संभाजीराजे हे महाविकास आघाडीच्या कोणत्याही एका घटक पक्षात प्रवेश करून लोकसभा निवडणूक लढविणार या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे यांनी ट्विट करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. छत्रपती संभाजीराजे हे कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नसून, त्यांनी स्वत: स्थापन केलेल्या स्वराज्य पक्षाच्या माध्यमातूनच ते आगामी लोकसभा निवडणुकीस सामोरे जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. संभाजीराजे जरी स्वराज्य पक्षातच राहणार असले तरी, वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असून स्वराज्य पक्ष मात्र महाविकास आघाडीचा घटक होऊ शकतो, हे त्यांनी पूर्वीच स्पष्ट केले आहे. स्वराज्य पक्ष असताना इतर कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याचा प्रश्नच येत नाही. राज्यातील जनतेच्या विश्वासावर महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचे भविष्य हे‘स्वराज्य‘ असेल या ध्येयाने आपली व स्वराज्य पक्ष संघटनेची वाटचाल सुरूच राहणार असल्याचे संभाजीराजे यांनी आपल्या एक्स अकौंटवरुन जाहीर केले आहे.