संभाजी महाराज बलिदान मासाला प्रारंभ
बेळगाव : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे कार्य प्रत्येक हिंदूला समजावे, यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने धर्मवीर बलिदान मास पाळला जातो. फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या या काळात बलिदान मास पाळला जातो. रविवारपासून बलिदान मासाला प्रारंभ झाला. यानिमित्ताने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक येथील संभाजी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला. प्रारंभी प्रेरणामंत्र म्हणण्यात आले. तालुकाप्रमुख परशुराम कोकितकर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. संभाजी सूर्य हृदय श्लोक म्हणून ध्येयमंत्र म्हणण्यात आला. दररोज सकाळी 6.30 वाजता धर्मवीर संभाजी महाराज चौक येथे संभाजी महाराजांना सामूहिक आदरांजली वाहण्यात येणार असल्याचे कर्नाटक प्रांत प्रमुख किरण गावडे यांनी सांगितले. यावेळी जिल्हाप्रमुख विश्वनाथ पाटील, शहरप्रमुख अनंत चौगुले, तसेच विभागप्रमुख व धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बलिदान मास काळात संभाजी महाराजांच्या कर्तृत्वाची जाण व्हावी यासाठी आपली आवडती एखादी वस्तू अथवा सवयीचा त्याग केला जातो. त्यामुळे बरेच तरुण पायात चप्पल न घालणे, चहा सोडणे, मोबाईल न वापरणे असे विविध संकल्प करीत असतात.