पॅराग्लायडिंग करत समर्थ पोहोचला परीक्षेला
पाचगणी :
तुम्ही आत्तापर्यंत गाडीवर, सायकलवर, धावत, अगदी घोड्यावरून सुद्धा कॉलेजला जाणारे विद्यार्थी बघितले असतील पण वाई तालुक्यामधील पसरणी या गावातील एका पठ्ठ्याने तर कमालच केली. समर्थ महांगडे हा किसनवीर महाविद्यालय वाई या कॉलेजमध्ये बी. कॉमच्या पहिल्या वर्षाला आहे. पेपरला उशीर झाला म्हणून चक्क पॅराग्लायडिंग करत आकाशातून थेट कॉलेजमध्ये या पठ्ठ्याने एन्ट्री मारली आहे.
वाई तालुक्यातील पसरणी या गावातील एक विद्यार्थी समर्थ महांगडेने एका अनोख्या प्रकारे कॉलेजला पोहोचण्याची शक्कल लढवली. बीकॉमच्या पहिल्या वर्षातील या विद्यार्थ्याने परीक्षेला वेळेवर पोहोचण्यासाठी पॅराग्लायडिंगचा पर्याय निवडला. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होऊन लाखो ह्यूज आणि लाईक्स मिळवले आहेत.
समर्थ महांगडे एका परीक्षेच्या दिवशी पाचगणीला गेला होता. मात्र तिथे पोहोचल्यावर त्याला समजलं की आजच त्याची परीक्षा आहे. घाईघाईने तो कॉलेजला पोहोचण्याच्या प्रयत्नात असताना वाई-पाचगणी रोडवरील पसरणी घाटात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. अशा परिस्थितीत समर्थला वाटलं की त्याचा पेपर नक्कीच बुडेल. पण याचवेळी जीपी अॅडव्हेंचर्सचे गोविंद येवले यांनी त्याला मदतीचा हात दिला.
गोविंद येवले आणि त्यांच्या पॅराग्लायडिंग टीमने समर्थला पॅराग्लायडिंग करत घाट पार करून कॉलेजमध्ये पोहोचवण्याची शक्कल लढवली. समर्थने प्रारंभात जरी थोडं भीती घेतली असली, तरी गोविंद सरांच्या मदतीने त्याने पॅराग्लायडिंगची निवड केली आणि सुरक्षेची काळजी घेत परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचला.
समर्थ महांगडे म्हणतो, माझा पेपर सुरू होण्यापूर्वी फक्त 20 मिनिटे शिल्लक होती आणि मला वाटले की मी वेळेवर पोहोचणार नाही. गोविंद सरांनी पॅराग्लायडिंगचा सल्ला दिला आणि मी तो धाडसाने पत्करला. हा एक अनोखा अनुभव होता. त्यांच्या मदतीमुळेच मी पेपरला वेळेवर पोहोचू शकलो. जर त्यांनी मदत केली नसती, तर घाटातील वाहतूक कोंडीमुळे माझा पेपर नक्कीच बुडाला असता.
समर्थ महांगडेच्या पॅराग्लायडिंगच्या साहसाने एक गोष्ट सिद्ध केली आहे की, संकटांची परिस्थिती असताना धैर्य आणि योग्य मार्गदर्शनाने त्यावर मात केली जाऊ शकते. त्याच्या या अनोख्या पद्धतीने कॉलेजला पोहोचण्याच्या कथेने नवे विचार आणि साहसाची प्रेरणा दिली आहे. आजच्या काळात, जबाबदारी आणि धाडसाने घेतलेले निर्णय खूप महत्त्वाचे ठरतात आणि या विद्यार्थ्याने तेच सिद्ध करून दाखवले आहे.
- समर्थला पेपरला पोहोचवू शकलो त्याचा आनंद
पाचगणीतील हॅरीसन फॉल्स पॉईंटवर आम्ही पॅराग्लायडिंग जॉयराइड्स देतो. त्या दिवशी आम्ही चर्चा केली की हा विद्यार्थी ट्रॅफिक जाममुळे पेपरला पोहोचू शकणार नाही. त्याला मदतीची गरज होती आणि त्यासाठी आम्ही पॅराग्लायडिंगचा पर्याय दिला. आम्हाला आनंद आहे की आम्ही त्याला वेळेत पेपरला पोहोचवू शकलो.
गोविंद येवले, जीपी अॅडवेंचर्स
- पॅराग्लायडिंगचा साहसी अनुभव
सातारा जिह्यातील पसरणी घाटातील या अनोख्या घटनेने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. ही घटना केवळ ट्रॅफिक जामवर मात करण्याची एक गोष्ट नाही, तर ती एक साहसी अनुभवाची आणि युक्तीची कहाणी आहे. या विद्यार्थ्याचा हसत हसत पॅराग्लायडिंग करत कॉलेजमध्ये प्रवेश करणारा व्हिडिओ वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे, आणि त्याला लाखो लोकांनी लाईक्स आणि शेअर्स केले आहेत.