समरजीतसिंह घाटगे यांचा भाजपला राम राम! घाटगेंच्या पक्षप्रवेशासाठी जयंत पाटील कोल्हापूरात दाखल
शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांनी आज भाजपाला रामराम ठोकला. त्यांनी भाजप पक्षातून शरद पवार राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करण्याचे निश्चित केले. याबाबतचा निर्णय त्यांनी आज कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात घेतला. आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांच्या उपस्थितीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत.
गेली नऊ वर्षे समरजीतसिंह घाटगे यांनी कागल विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपला तळागाळापर्यंत पोहोचवले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेले मैत्रीचे नाते जपत त्यांनी कमळ हे चिन्ह तालुक्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यात यश मिळवले. गत विधानसभा निवडणुकीत त्यांना भाजपाची कमळ चिन्ह न मिळाल्याने त्यांना अपक्ष लढावे लागले. आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार पालकमंत्री हसन मुश्रीफ हे भाजपा बरोबर युतीत असल्याने स्वता अजित पवार यांनी त्यांची उमेदवारी 11 ऑगस्ट रोजी जाहीर केली. या राजकिय घडामोडीमुळे समरजितसिंह घाटगे यांची चांगलीच कोंडी झाली होती. ती आज फुटली.
आज आपल्या गटाची राजकिय दिशा आणि भुमिका ठरवताना समरजीत घाटगे यांच्या गटाचा निर्धार मेळावा शाहू कारखान्याच्या कार्यस्थळावर पार पडला. यासाठी त्यांनी शाहू कारखान्याच्या प्रधान कार्यालयात आयोजित मेळाव्यात कार्यकर्त्यांचे मत जाणून घेतले. आज सकाळपासून कार्यकर्त्यांनी जयसिंगराव घाटगे भवन परिसरात गर्दी केली होती. मोठ्या उत्साहाने लोक जमा झाले होते. डर जरुरी है, गद्दारी हटवा...तुतारी वाजवा , एकच निर्धार...राजे आमदार, कोण म्हणतो येत नाही ...आल्याशिवाय राहत नाही, कागलच्या ढाण्या वाघाचा विजय असो...., राजसाहेब आगे बढो.... असे या घोषणा व फलक घेऊन कार्यकर्ते जमा झाले होते.
कार्यकर्त्यांच्या प्रचंड उत्साहात समरजीतसिंह घाटगे यांनी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाऊन तुतारी हे चिन्ह घेण्याची निश्चित केले. आज दुपारी चारच्या सुमारास शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जयंत पाटील हे मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत समरजीतसिंह घाटगे हे आपण शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करीत असल्याचे जाहीर करणार आहेत.