Samarjeetsinh Ghatge यांच्या मनात चाललंय तरी काय?, BJP सोबत भेटीगाठी वाढल्या
विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून ते मतदार संघात भाजपची ताकद वाढवत होते
By : इम्रान मकानदार
कागल : सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात असणारे शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या अलिकडे भाजप नेत्यांशी होणाऱ्या भेटीगाठींमुळे चर्चेला उधाण आले आहे. गेल्या काही दिवसात त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क वाढवला आहे. त्यामुळे समरजितसिंह घाटगे यांच्या मनात चाललंय तरी काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
गेल्या आठ-दहा दिवसात घाटगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सहकारी पाणीपुरवठा संस्थांचे अनुदान पूर्ववत करा अशा मागणीचे निवेदन दिले. याचबरोबर दोनच दिवसांपूर्वी झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देतानाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
याचबरोबर केंद्रीय मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेऊन कागलमध्ये पिलरच्या पुलास मंजुरी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. मध्यंतरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही घाटगे यांनी भेट घेतली होती.
2019 ची विधानसभा निवडणूक लढवून आमदार मुश्रीफ यांच्या विरोधात कडवी झुंज देणारे भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. निवडणुकीचा निकाल लागताच मतदारसंघात त्यांनी मुश्रीफ यांना टक्कर देण्यास सुरुवात केली होती. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून ते मतदार संघात भाजपची ताकद वाढवत होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांची जवळीक होती. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात कागल विधानसभा मतदारसंघात 2024 च्या निवडणुकीची जोरदार तयारी करत होते. मात्र हसन मुश्रीफ हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्याने समरजितसिंह घाटगे यांच्यापुढे दुसऱ्या पक्षात प्रवेश केल्याशिवाय पर्याय नव्हता.
त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घाटगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातर्फे समरजितसिंह घाटगे यांनी मागील विधानसभा निवडणूक लढवली. मात्र या निवडणुकीत घाटगे यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
विधानसभा निवडणुकीनंतर घाटगे हे काहीकाळ राजकारणापासून अलिप्तच होते. त्यामुळे घाटगे हे पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा सुरू झाली. ही चर्चा सुरू असतानाच माजी आमदार संजय घाटगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे समरजितसिंह घाटगे यांची अडचण झाली.
समरजितसिंह घाटगे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू असताना त्यांनी आपण भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचे सांगितले. मात्र गेल्या 15 दिवसात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही घाटगे यांनी भेट घेतली होती. त्यामुळे घाटगे यांच्या मनात चाललंय तरी काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
...तर पुन्हा अडचण
राज्याच्या राजकारणात केव्हा काय होईल हे कोणालाच सांगता येत नाही. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष व अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा मध्यंतरी रंगल्या होत्या. असे झाल्यास घाटगे यांची अडचणच होणार आहे. त्यामुळेच घाटगे काय भूमिका घेतात, हे पहावे लागणार आहे.