For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

समरदीप सिंग गिलला गोळाफेकीत सुवर्ण

06:12 AM May 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
समरदीप सिंग गिलला गोळाफेकीत सुवर्ण
Advertisement

वृत्तसंस्था, रांची

Advertisement

येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय वरिष्ठांच्या फेडरेशन अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी मध्यप्रदेशच्या समरदीप सिंग गिलने पुरूषांच्या गोळाफेक प्रकारात पंजाबचा अव्वल अॅथलिट तजिंदरपाल सिंग तूरला मागे टाकत सुवर्णपदक पटकाविले. या स्पर्धेमध्ये ओडिशाच्या अनिमेश कुजूरने, कर्नाटकाच्या शिवाजी परशुरामने तसेच पी. यशसने, महाराष्ट्राच्या शिवम लोहकरेने विविध क्रीडा प्रकारात सुवर्णपदके मिळविली.

पुरूषांच्या गोळाफेक प्रकारात मध्यप्रदेशच्या 25 वर्षीय समरदीप सिंग गिलने 20.43 मी.ची नोंद करत सुवर्णपदक पटकाविले. पंजाबच्या तूरने 20.07 मी.ची नोंद करत रौप्य पदक तर पंजाबच्या करणवीर सिंगने कांस्यपदक घेतले. तूरने यापूर्वी या क्रीडा प्रकारात दोनवेळा आशियाई क्रीडा स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते. तूरने 21.77 मी.चा राष्ट्रीय विक्रम यापूर्वी नोंदविला होता. पण गिलला हा विक्रम मोडता आला नाही. आगामी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी या क्रीडा प्रकारात 20.36 पात्रतेची मर्यादा ठेवण्यात आली आहे.

Advertisement

पुरूषांच्या 400 मी. अडथळ्याच्या शर्यतीत कर्नाटकाच्या पी. यशस आणि त्रिवेंद्रमच्या संतोषकुमारने राष्ट्रकुल स्पर्धेसाठीची मर्यादा पार केली. पण कर्नाटकाच्या यशसने या क्रीडा प्रकारात 49.00 सेकंदांचा अवधी घेत सुवर्ण, संतोषकुमारने रौप्य आणि नौदलाच्या सुभाष दासने कांस्यपदक मिळविले.

कर्नाटकाच्या शिवाजी परशुरामने 5000 मी. धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळविताना 14 मिनिटे 14.43 सेकंदांचा अवधी घेतला. मध्यप्रदेशच्या विनोद सिंगने रौप्य तर उत्तराखंडच्या दीपक भट्टने कांस्यपदक मिळविले. पुरूषांच्या 200 मी. धावण्याच्या शर्यतीत ओडिशाच्या अनिमेश कुजूरने सुवर्णपदक मिळविताना 20.64 सेकंदांचा अवधी घेतला. पुरूषांच्या भालाफेक प्रकारात महाराष्ट्राच्या शिवम लोहकरेने सुवर्णपदक मिळविताना 81.71 मी.चे अंतर नोंदविले. राजस्थानच्या यशवीर सिंगने रौप्य तर रेल्वेच्या रोहीत यादवने कांस्यपदक घेतले.

महिलांच्या 200 मी. धावण्याच्या शर्यतीत हिमाचल प्रदेशच्या कुसुम ठाकुरने 23.94 सेकंदांचा अवधी घेत सुवर्णपदक, हरियाणाच्या तमन्नाने रौप्य आणि महाराष्ट्राच्या सुदेष्णाने कांस्यपदक घेतले. 5000 मी. धावण्याच्या शर्यतीत रिलायन्सच्या सीमाने सुवर्ण, महाराष्ट्राच्या रविना गायकवाडने रौप्य तर सोनम परमारने कांस्यपदक मिळविले. महिलांच्या उंचउडीत उत्तरप्रदेशच्या ख्याती माथुरने 1.82 मी.चे अंतर नोंदवित सुवर्ण, रेल्वेच्या मानसीने रौप्य आणि अभिनया शेट्टीने कांस्यपदक मिळविले. केरळच्या अनामिकाने हेप्टॅथ्लॉनमध्ये सुवर्णपदक मिळविताना 5685 गुण घेतले.

Advertisement
Tags :

.