निर्मात्याच्या भूमिकेत समांथा
प्रॉडक्शन कंपनीच्या पहिल्या चित्रपटाची घोषणा
स्वत:च्या अभिनयाने लोकांची मने जिंकणारे अनेक कलाकार निर्माता म्हणूनही कार्यरत आहेत. या यादीत आता समांथा रुथ प्रभूचे नाव जोडले गेले आहे. समांथा आता चित्रपट निर्माती म्हणून कारकीर्द सुरू करत आहे. समांथाने स्वत:चे प्रॉडक्शन हाउस त्रालाला मूव्हिंग पिक्चर्सच्या बॅनर अंतर्गत पहिल्या चित्रपटाची घोषणा केली आहे.
शुभम असे या चित्रपटाचे नाव असणार आहे. त्रालाला मूव्हिंग पिक्चर्स अंतर्गत याची निर्मिती केली जाणार आहे. त्रालाला मूव्हिंग पिक्चर्सच्या पहिल्या चित्रपटाची घोषणा करताता अत्यंत आनंद होत असल्याचे तिने म्हटले आहे. समांथाने स्वत:च्या प्रॉडक्शन हाउसची घोषणा 2023 मध्ये केली होती. शुभम या चित्रपटाच्या कहाणी अन् कलाकारांसंबंधीअधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही. परंतु या चित्रपटाचा टीझर लवकरच सादर केला जाणार असल्याची चर्चा आहे.
समांथा यापूर्वी वरुण धवनसोबत अमेझॉन प्राइमची सीरिज ‘सिटाडेल : हनी बनी’मध्ये दिसुन आली होती. तर पुढील काळात ती रक्तब्रह्मांड या सीरिजमध्ये दिसून येणार आहे. यात ती राज अँड डीके या जोडीसोबत पुन्हा काम करत आहे. या सीरिजमध्ये वामिका गब्बी ही आघाडीची अभिनेत्रीही मुख्य भूमिकेत आहे.