‘मां इंटी बंगारम’मध्ये समांथा
चित्रपटात अॅक्शन अवतारात अभिनेत्री
अभिनेत्री-निर्माती समांथा रुथ प्रभूचा नवा चित्रपट ‘मां इंटी बंगारम’चा टीझर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटासंबंधी दीर्घकाळापासून प्रतीक्षा केली जात होती. तर टीझर पाहून चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. टीझरमध्ये इमोशन्सपासून अॅक्शनपर्यंत दिसून येते. समांथाने स्वत:च्या इन्स्टाग्राम हँडलवर बहुप्रतीक्षित टीझर शेअर केला आहे. याच्या सुरुवातीला एक महिला (समांथा) पतीसोबत स्वत:च्या सासरी पोहोचते. एका आठवड्यात सर्वांची मने जिंकेन, असे आश्वासन तेथे ती देते. एक आदर्श सून होण्याच्या प्रयत्नात ती पूर्णपणे स्वत:ला झोकून देते. स्वत:च्या सासरच्या लोकांसमोर ती शांत न् निष्पाप दिसते. टीझरमध्ये समांथाला एक दमदार अॅक्शन रोलमध्ये दाखविण्यात आले आहे. ती एकटीच गुंडांना लोळवून, भीषण गोळीबारात सामील होते आणि नंतर मृतदेहांची विल्हेवाट लावताना दिसून येते. या चित्रपटाची निर्मिती समांथाचा पती राज निदिमोरूने केली आहे. तर दिग्दर्शन नंदिनी रे•ाrने केले आहे. नंदिनी आणि समांथाची जोडी ‘ओह! बेबी’नंतर पुन्हा एकत्र आली आहे. समांथासोबत या चित्रपटात गुलशन देवैया आणि दिगंथ मुख्य भूमिकेत आहेत. तर दिग्गज अभिनेत्री गौतमी आणि मंजुषा महत्त्वाच्या भूमिकेत दिसून येतील. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.