‘समग्र’चे पाच कोटी रुपये गायब प्रकरण सीआयडीकडे
तपासाला मनुष्यबळ, गती देण्यासाठी निर्णय
पणजी : गोवा समग्र शिक्षा अभियानच्या खात्यातील पाच कोटी रुपये गायब प्रकरण आता गुन्हा अन्वेषण विभाग पोलिसांकडे (सीआयडी) देण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. पर्वरी पोलिसांकडे या प्रकरणाची नोंद झाल्यानंतर त्यांनी या प्रकरणाचा सखोल अभ्यास करून अवघ्या काही दिवसांतच पाच संशयितांना अटक केली होती. सर्व संशयित पोलिस कोठडीत आहेत. त्यापैकी पूर्णशिष साना या संशयिताच्या पोलिस कोठडीत सहा दिवसांची वाढ केली आहे.
पर्वरी पोलिसांनी या प्रकरणाचा अधिकाधिक तपास पूर्ण केला आहे मात्र या प्रकरणातील मुख्य संशयित अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. पाच कोटीची फसवणूक करणारे एक मोठे रॅकेट असून त्यांच्या सर्व हालचाली गोव्याबाहेरून होत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या संशयितांना ताब्यात घेण्यासाठी नियमित गोवा पोलिसांना गोव्याबाहेर जावे लागणार आहे. पर्वरी पोलिसांकडे अगोदरच कर्मचारी कमी असून त्यात पोलिस गोव्याबाहेर जात राहिल्यास पर्वरी पोलिसस्थानकात अडचण निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हे प्रकरण आता गुन्हा अन्वेषण विभागाकडे देण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.