सॅम पित्रोदा यांची राहुल गांधींवर स्तुतीसुमने
पंतप्रधान होण्याचे गुण असल्याचा दावा : राजीव गांधींपेक्षा समजुतदार असल्याचेही स्पष्ट
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
गांधी परिवाराचे निकटवर्तीय आणि इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर बरीच स्तुतीसुमने उधळली आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी हे त्यांचे वडील राजीव गांधी यांच्यापेक्षा अधिक बौद्धिक आणि धोरणात्मक आहेत. तसेच राहुल गांधी यांच्यात भावी पंतप्रधान होण्यासाठी सर्व गुण असून ते राजीव गांधींपेक्षा अधिक समजुतदार असल्याचा दावाही त्यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.
इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी राहुल गांधी आपल्या परदेश दौऱ्यांवर देशाचे नाव बदनाम करत असल्याचा आरोप करणाऱ्या भाजपच्या टिप्पण्या खोट्या असल्याचे म्हटले आहे. राहुल गांधी हे राजीव गांधींपेक्षा जास्त हुशार आहेत. बौद्धिक असण्यासोबतच ते एक उत्तम रणनीतीकार देखील आहेत, असे पित्रोदा म्हणाले. मात्र, राजीव गांधी जास्त मेहनती होते, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.
गांधी घराण्याचे दीर्घकाळ सल्लागार राहिलेले सॅम पित्रोदा यांनी शिकागो येथील पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बऱ्याच गोष्टी उघड केल्या. राहुल यांची चुकीची प्रतिमा निर्माण करण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली होती. त्यांची बदनामी करण्यासाठी कोट्यावधी डॉलर्स खर्च करण्यात आले. माध्यमांमध्ये राहुल गांधींची प्रतिमा नियोजनबद्ध प्रचारावर आधारित होती. राहुल खूप शिकलेले आहेत. मात्र, त्यांच्याबद्दल खोट्या पसरवल्या जात होत्या. राहुल गांधी यांची खरी प्रतिमा आता समोर येत आहे, असेही त्यांनी सांगितले.
एखाद्या व्यक्तीवर, त्याच्या कुटुंबावर, त्याचा वारसा, पक्षाच्या चारित्र्यावर दिवसरात्र हल्ला करणे वाईट आहे. काही लोक जाणूनबुजून खोटे बोलतात, फसवतात आणि एखाद्या व्यक्तीबद्दल अपप्रचार करतात. मात्र, आता माध्यमांवर कुणाचे तरी नियंत्रण असल्याचे जनतेच्या लक्षात येऊ लागले आहे. एखाद्याचे नुकसान करण्यासाठी खोट्या बातम्या तयार केल्या जातात, हे आता लोकांनाही कळून चुकले आहे, असेही पित्रोदा म्हणाले. परदेश दौऱ्यांदरम्यान केंद्रावर टीका करणाऱ्या राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर भाजपचा हल्ला निराधार असल्याचे पित्रोदा यांनी म्हटले आहे. सरकारवर टीका करणे म्हणजे भारतावर टीका करणे नव्हे. विरोधी पक्षनेत्यांनी सरकारवर टीका करायला हरकत नाही, असेही ते पुढे म्हणाले.
राहुलला आयुष्यात दोन मोठे धक्के बसले आहेत. त्यांनी आपल्या आजी आणि वडिलांचा मृत्यू पाहिला. राहुल आणि राजीव यांचा प्रवास वेगळा आहे. काँग्रेसच्या संस्थापकांनी ज्या भारताची कल्पना केली होती त्या भारताची निर्मिती करणे हे आपल्या सर्व काँग्रेस नेत्यांचे सामूहिक कार्य आहे, असेही पित्रोदा यांनी सांगितले.