जिवंतपणी मोक्ष
अध्याय अकरावा
व्यवसायानुसार बाप्पांनी समाजाचे कल्पनेने चार भाग केले. हे करताना त्यांच्या मनात हा श्रेष्ठ तो कनिष्ठ असा भाव नव्हता. ज्याप्रमाणे आईवडील हे कुटूंबाचे प्रमुख असतात ते सर्व मुलांना सारखीच वागणूक देतात, तसेच सर्व मुलांचं कल्याण व्हावं अशीच भावना त्यांच्या मनात असते. त्याप्रमाणे बाप्पा हे सर्व समाजाचे प्रमुख असल्यामुळे त्यांना सर्वजण सारखेच महत्त्वाचे आहेत. प्रत्येकाचं भलं व्हावं, प्रत्येकाने स्वत:चा उद्धार करून घ्यावा अशीच त्यांची इच्छा आहे. ज्याच्या वाटणीला जे काम येईल तोच त्याचा वर्ण आणि तोच त्याचा स्वधर्म अशी त्यांची भूमिका आहे.
माणसाने स्वत:ला कर्ता न समजता वाटणीला आलेलं काम हे ईश्वराचे कार्य आहे असं समजून निरपेक्षतेने पार पाडावे आणि देवा तू दिलेलं काम यथाशक्ती तू माझ्याकडून करून घेतलंस आता तुझ्या मर्जीनुसार ते जसं आणि जेव्हढं पूर्ण झालेलं आहे ते मी तुला अर्पण करत आहे या भावनेनं ईश्वराला अर्पण करावे. याप्रमाणे वागणाऱ्या मनुष्याला त्याच्या कर्माचा लेप लागत नसल्याने त्याचे नवीन प्रारब्ध तयार होत नाही. या जन्मी जे भोग वाट्याला आलेले असतील ते भोगून झाले की, त्याचा उद्धार होतो अशी खात्री बाप्पा पुढील श्लोकात देत आहेत.
स्वस्वकर्मरता एते मय्यर्प्याखिलकारिणऽ ।
मत्प्रसादात्स्थिरं स्थानं यान्ति ते परमं नृप ।। 34।।
अर्थ- आपआपल्या कर्माचे ठिकाणी रत असणारे माझ्या ठिकाणी सर्व कर्म अर्पण करून, माझ्या प्रसादाने शाश्वत व अत्यंत स्थिर अशा स्थानाला जातात.
विवरण- ईश्वरावर श्रद्धा असलेल्या मनुष्य, आपण करत असलेलं काम हे ईश्वराचं काम असून ते त्यानं आपल्यातली कुवत ओळखून, आपल्याला करायला दिलंय हे जाणून असतो. साहजिकच त्याच्या वाटणीला आलेल्या कामाबद्दल त्याला आपलेपणा वाटत असतो. तन, मन, धन, अर्पण करून तो ते कार्य पूर्ण करायचा प्रयत्न करत असतो. त्यात त्याला बुद्धीची साथ लाभलेली असते. अशावेळी त्याला जगाचा विसर पडतो. त्यामुळे त्याचा अहंकार नष्ट होतो आणि त्याची चित्तशुद्धी होत राहते. त्यातून समोर दिसणाऱ्या गोष्टी तात्पुरत्या असून कधी ना कधी नष्ट होणाऱ्या आहेत हे लक्षात येते व याहीपलीकडे कायम टिकणारी काही तत्वे असून त्या तत्वाकडून समोर दिसणाऱ्या जगाची कार्ये पार पाडली जात आहेत अशी जाणीव त्याला होते. ही परमतत्वाची जाणीव त्याला मोक्षमार्गावर आणून उभी करते. तो हळूहळू समाधानी होत जातो व आपण ज्या स्थितीत आहोत तीच आपल्या दृष्टीने उत्तम स्थिती असून यात कोणताही बदल नको असे त्याला वाटू लागते. ह्या मन:स्थितीत तो जेव्हा जेव्हा असतो तेव्हा तेव्हा तो मोक्षपदी आरूढ झालेला असतो. म्हणजेच मोक्षस्थिती ही मृत्यूनंतर अनुभवण्याची स्थिती नसून जिवंतपणी अनुभवण्याची गोष्ट आहे. ही कायम टिकावी असे प्रत्येकाला वाटणे साहजिक आहे. आहे ह्या परिस्थितीत बदल नको असे वाटणे तेव्हाच शक्य आहे जेव्हा ती कायम अनुकूल असेल पण परिस्थिती कायम अनुकूल असेलच असे सांगता येत नाही. म्हणून कायम मोक्षपदी राहण्यासाठी मन स्थिर असणे आवश्यक आहे. त्यासाठी आयुष्यात एखादी आनंदाची घटना घडली तर त्यात आपले कर्तृत्व नसून ती आपल्या प्रारब्धानुसार घडलेली आहे हे समजून त्यातील आनंद घ्यावा व दु:खद असेल तर ती सुसह्य करायला ईश्वर आपल्या पाठीशी आहे या विचारांनी तो कायम समाधानी रहावे. ह्या विचाराने जो कायम समाधानी राहतो तो जिवंतपणीच मोक्षपदी आरूढ झालेला असतो आणि शेवटपर्यंत तो तिथेच टिकून राहतो. संत चरित्रांचा जर अभ्यास केला तर त्यांच्या कायम समाधानी असण्याचं रहस्य ते आयुष्यभर कुणाविषयी कोणतीही तक्रार न करता रहात होते यातच दडलेलं आहे हे लगेच लक्षात येतं.
क्रमश: