सलग 12 तास लाठीकाठीने शंभूराजेंना अभिवादन...संभाजी ब्रिगेडचा उपक्रम : पैलवान संपत पाटील यांचे सादरीकरण
आठ वर्षाच्या दक्षनेही केले दोन तास प्रात्याक्षिक सादर
कोल्हापूर प्रतिनिधी
धर्मवीर रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी सलग बारा तास लाठीकाठीचे सादरीकरण करत अनोख्या पद्धतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. गिरगाव येथील भैरवनाथ तालमीचे पैलवान संपत पाटील यांनी लाठीकाठीची प्रात्याक्षिके सादर केली. आठ वर्षाचा मुलगा दक्ष यानेही या उपक्रमात सहभाग घेत सलग दोन तास लाठीकाठीचे प्रात्याक्षिक सादर केले. संभाजी ब्रिगेडने या उपक्रमाचे आयोजन केले होते.
पापाची तिकटी येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून पाटील यांनी मंगळवारी पहाटे 4 वाजता या उपक्रमाला सुरूवात केली. दुपारी 4 वाजेपर्यंत दोन्ही हातात काठी घेऊन सलग 12 तास मर्दानी खेळाचे प्रात्याक्षिक सादर केले. विविध सामाजिक संस्था, तालीम मंडळाच्यावतीने पापाची तिकटी येथे छत्रपती संभाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. सकाळी दहा वाजता पाळणा म्हंटला. अभिवादनासाठी दिवसभर गर्दी होती. सायंकाळी प्रसाद झाला. यावेळी संभाजी ब्रिगेडचे रुपेश पाटील, धनाजी मोरबाळे, राहुल पाटील, महादेव कांबळे, महेश लोहार, उत्तम पाटील, वस्ताद आनंदा पाटील, मराठा सेवा संघाचे अश्विन वागळे, अजय शिंदे, शाहीर दिलीप सावंत, विजय साळोखे सरदार, ओमकार शिंदे आदी उपस्थित होते.
छत्रपती संभाजी महाराजांचा अखंड जयघोष
रूईकर कॉलनी येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याभोवती आकर्षक विद्युत रोषणाई केली होती. मान्यवरांच्या हस्ते सकाळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.