Solapur News | डॉ. अंत्रोळीकर हे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचा अभिमान"; स्मृतिस्थळाच्या विकासकामांना प्राधान्य देणार : पालकमंत्री जयकुमार गोरे
अंत्रोळी (समीर शेख ) - देशभक्त स्वातंत्र्यसैनिक डॉ. कृष्णा (भाऊकाका) भीमराव अंत्रोळीकर यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण शनिवारी (दि. ११) सायंकाळी अंत्रोळी (ता. दक्षिण सोलापूर) येथे महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. स्वातंत्र्यलढ्यातील या थोर सेनानीच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
कार्यक्रमास सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी कार्यक्रमस्थळी भेट देऊन डॉ. अंत्रोळीकर यांच्या कार्याला अभिवादन केले. मात्र, पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे त्या अर्धपुतळ्याच्या अनावरणापूर्वीच तेथून रवाना झाल्या.
यावेळी शहाजी पवार, शशिकांत चव्हाण, महानगरपालिका गटनेते नरेंद्र काळे, नगरसेविका रोहिणी तडवळकर, रामभाऊ तडवळकर, जिल्हा परिषद सदस्या सोनाली कडते, पंचायत समिती सदस्या प्रियांका आसबे, सभापती संदीप टेळे, मंद्रूपचे अप्पर तहसीलदार विष्णू बुटे, स्वातंत्र्य सेनानी डॉ. कृ. भि. अंत्रोळीकर स्मृती न्यासाचे अध्यक्ष प्रा. डॉ. श्रीकांत येळेगावकर, कार्याध्यक्ष मोहन अंत्रोळीकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
समारंभात बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, "डॉ. अंत्रोळीकर हे केवळ अंत्रोळी गावाचेच नव्हे, तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आहेत. स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी दिलेले योगदान इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदले गेले आहे. त्या काळात एमबीबीएस पदवीधर असलेले ते उच्चशिक्षित, सुसंस्कृत आणि सर्वसामान्यांच्या सेवेसाठी आयुष्य वाहणारे डॉक्टर होते. असहकार चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यांची साधी राहणी, उच्च विचारसरणी आणि राष्ट्रनिष्ठा आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे."
ते पुढे म्हणाले, "सोलापूरच्या चार हुतात्म्यांपैकी कुर्बान हुसेन हे त्यांचे शिष्य होते, तर इतर हुतात्मे त्यांचे सहकारी व मित्र होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसा अर्धपुतळा उभारण्यात आला असून, त्यामुळे भावी पिढीला स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास आणि त्यागाची प्रेरणा मिळेल. पुतळा उभारणीसाठी परिश्रम घेतलेल्या समितीचे मनापासून अभिनंदन करतो."
ग्रामविकास मंत्री म्हणून अंत्रोळी गावाला प्रथमच भेट दिल्याचे सांगत श्री. गोरे यांनी ग्रामस्थांनी सादर केलेल्या निवेदनाची दखल घेत डॉ. अंत्रोळीकर यांच्या स्मरणार्थ प्रस्तावित विकासकामे प्राधान्याने पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाही दिली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामपंचायत अंत्रोळीच्या सरपंच मायावती ब्रह्मदेव सलगरे, उपसरपंच सोनाली अदिनाथ खरात, ग्रामसेवक गणेश फडतरे, द्राक्ष बागायतदार बाळासाहेब झांबरे-पाटील, ज्येष्ठ नागरिक ब्रह्मदेव सलगरे, मजनुद्दीन पठाण, नानाप्पा करपे, गणेश कुंभार, ग्रामपंचायत सदस्य बापूसाहेब शेख, इन्नुस शेख, नेताजी थोरात, नागनाथ कोळी, राजू कोळी, भाऊराया बेलदार तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या सुरळीत नियोजनासाठी मंद्रूप पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर पटवारी, पोलीस उपनिरीक्षक राज डांगे तसेच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले.
स्वातंत्र्य सेनानी डॉ. कृ. भि. अंत्रोळीकर स्मृती न्यास, सोलापूरचे अध्यक्ष प्रा. डॉ. श्रीकांत येळेगावकर व कार्याध्यक्ष मोहन अंत्रोळीकर यांच्या पुढाकारातून आयोजित या ऐतिहासिक सोहळ्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्वातंत्र्यलढ्यातील एका थोर सेनानीच्या कार्याचा गौरव करणारा हा सोहळा अंत्रोळीच्या इतिहासातील संस्मरणीय क्षण ठरला.