For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘भारत माता की जय’ म्हणून 21 वेळा तिरंग्याला सलामी द्यावी

12:43 PM Oct 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘भारत माता की जय’ म्हणून 21 वेळा तिरंग्याला सलामी द्यावी
Advertisement

जबलपूर खंडपीठाचा देशभरासाठी महत्वपूर्ण आदेश : हिंदुस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्याचा खटला

Advertisement

मडगाव : ‘पाकिस्तान जिंदाबाद हिंदुस्तान मुर्दाबाद’ अशी घोषणा देणाऱ्या फैजल उर्फ फैजान या संशयिताला न्यायालयाने भोपाळ येथील पोलिसस्थानकासमोर भारतीय तिरंग्याला 21 वेळा सलामी देऊन 21 वेळा ‘भारत माता की जय’ घोषणा या खटल्याचा अंतिम निवाडा होईपर्यंत देण्याचा आदेश मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या जबलपूर खंडपीठाचे न्यायाधीश दिनेशकुमार पलिवाल यांनी दिला आहे.  जबलपूर खंडपीठात सादर केलेल्या कागदपत्रांनुसार फैझल उर्फ फैजान याने ‘पाकिस्तान झिंदाबाद, हिंदुस्थान मुर्दाबाद’ अशा घोषणा देऊन अनेक गटांमध्ये वैमनस्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे जातीय सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मकतेला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप फैजलवर होता. पोलिसानी याबाबत तपास करुन न्यायालयात आरोपपत्र सादर केले. फैजल उर्फ फैजान याने न्यायालयात सांगितले की अशा प्रकरचा गुन्हा आपण केलेलाच नाही. फैझल निष्पाप आहे, त्याच्याविरुद्ध खोटा आरोप लावून त्याला नाहक या प्रकरणात गोवण्यात आलेले आहे, म्हणून काही अटी घलून त्याला जामिनावर सोडण्यात यावे, असा युक्तिवाद त्याचे वकील हकीम खान यानी न्यायालयात केला.

न्यायालयात वीडीओ सादर

Advertisement

सरकारपक्षाने न्यायालयात वीडीओ सादर केला, ज्यात फैजल वरीलप्रमाणे घोषणा देत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत होते आणि आवाजही स्पष्ट येत होता. सरकारपक्षाने उच्च न्यायालयाच्या निदर्शनाला असे आणून दिले की हा खटला कनिष्ठ न्यायालयामध्ये चालू आहे. हा आरोप सिद्ध झाल्यास जास्तीत जास्त तीन वर्षांच्या कैदेची शिक्षा आहे.  संशयिताला अटी घालून जामिनावर सोडण्यात यावे, असे संशयिताच्या वकिलाने न्यायालयाकडे युक्तिवाद केला.

 त्याने पसंतीच्या देशात जाण्याचा पर्याय स्वीकारावा

सरकारपक्षाची बाजू मांडताना अॅड. सी. के. मिश्रा यांनी जामीन अर्जाला विरोध केला. फैजलची पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे. त्याच्याविरुद्ध तब्बल 14 गंभीर गुन्हे नोंद आहेत. ज्या देशात फैजल ज्न्माला आला, ज्या देशात लहानाचा मोठा झाला त्या देशाविरुद्ध म्हणजे भारताविरुद्ध खुलेआम घोषणा देत आहे. भारतात जर तो समाधानी नसेल तर झिंदाबादची घोषणा देणाऱ्या त्याच्या पसंतीच्या देशात त्याने राहण्याचा पर्याय स्विकारावा, असे सांगून जामिनासाठीच्या अर्जाला विरोध केला.

दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या जबलपूर खंडीपठाने अनेक अटी घालून संशयित फैजलला जामिनावर सोडण्याचा आदेश दिला. 50 हजार रुपयांचे वयैक्तिक बॉण्ड सादर करावे, तसेच तितक्याच रकमेचा एक हमीदार सादर करावा, खटल्याच्यावेळी नियमितपणे न्यायालयात हजर राहावे, या खटल्याचा निकाल लागेपर्यंत प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व चौथ्या मंगळवारी सकाळी 10 ते दुपारी 12 या दरम्यान भोपाळ येथील मीसरोड पोलिसस्थानकासमोर फडकत असलेल्या तिरंग्याला ‘भारत माता की जय’ अशी घोषणा देऊन 21  वेळा सलामी द्यावी, असा आदेश दिला आहे.

Advertisement
Tags :

.