रिल्सपासून रुपेरी पडद्यापर्यंत सलोनी कदमची झेप; ‘गमन’मधून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण
देवगड / प्रतिनिधी : सोशल मीडियावरील रिल्सच्या माध्यमातून आपल्या अभिनयकलेला व्यासपीठ मिळवून देत थेट रुपेरी पडद्यावर झळकण्याचे स्वप्न देवगड तालुक्यातील गढीताम्हाणे येथील सलोनी संजय कदम यांनी साकारले आहे. ‘गमन’ या मराठी चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले असून, ग्रामीण भागातील एका युवा कलाकाराने सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यापर्यंत मजल मारल्याने त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हे केवळ मनोरंजनाचे साधन न राहता नवोदित कलाकारांसाठी आपली कला जगासमोर मांडण्याचे प्रभावी व्यासपीठ बनले आहे. सलोनी कदम यांनीही रिल्सच्या माध्यमातून अभिनयाची आवड जोपासत विविध भूमिका सादर केल्या. त्यांच्या या प्रयत्नांना ‘गमन’ चित्रपटाच्या माध्यमातून मोठी संधी मिळाली आणि त्यांच्या अभिनय प्रवासाला नवी दिशा मिळाली.
‘गमन’मध्ये साकारली महत्त्वाची भूमिका
‘गमन’ चित्रपटात सलोनी यांनी अभिनेता सचिन वळंजू यांनी साकारलेल्या ‘पाशा’ या व्यक्तिरेखेच्या पत्नीची भूमिका केली आहे. भूमिका तुलनेने छोटी असली तरी मोठ्या पडद्यावर काम करण्याची संधी मिळणे हा आपल्यासाठी खास आणि अविस्मरणीय अनुभव असल्याचे सलोनी यांनी व्यक्त केले.
मनोज नाईक-साटम लिखित व दिग्दर्शित आणि मानसी नाईक-साटम निर्मित ‘गमन’ हा कौटुंबिक आणि भावनिक आशयाचा मराठी चित्रपट आहे. 2 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित झाला. कोकणातून रोजगाराच्या शोधात मुंबईसारख्या शहरांकडे होणारे स्थलांतर, त्यातून गावातील बदलणारे सामाजिक जीवन, कौटुंबिक नाती आणि आपल्या मातीशी असलेले अतूट नाते या विषयांना चित्रपटातून स्पर्श करण्यात आला आहे.
चित्रपटात कोकणातील हिरवाई, लाल माती, कौलारू घरे आणि ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडते. त्याचबरोबर रोजगारासाठी होणाऱ्या स्थलांतरामुळे गावांमध्ये निर्माण होणारा ओसाडपणा आणि मागे राहिलेल्या कुटुंबांची भावनिक घालमेलही चित्रपटातून मांडण्यात आली आहे.
देवगडमध्येही झाले चित्रीकरण
‘गमन’ चित्रपटात नारायण जाधव, श्रद्धा खानोलकर, हर्षिका मेळेकर, सचिन वळंजू आणि दीपक कुमार यांच्यासह अन्य कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. सुमारे 1 तास 46 मिनिटांच्या या चित्रपटाचे चित्रीकरण मुंबई, कोकण आणि देवगड तालुक्यातील नारिग्रे परिसरात करण्यात आले आहे.
या चित्रपटाची पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (PIFF) मराठी स्पर्धा विभागासाठी निवड झाली होती. तसेच थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये चित्रपटाला कथेसाठी विशेष ज्युरी सन्मानही मिळाला आहे.
शिक्षणासोबत कलाक्षेत्रातही वाटचाल
सलोनी कदम सध्या देवगड येथील श्री. स. ह. केळकर कॉलेजमध्ये एमएचे पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. त्या व्यावसायिक मेहंदी आर्टिस्ट म्हणूनही कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी काही नाटकांमध्ये रंगभूषा आणि वेशभूषेची जबाबदारी सांभाळली आहे. तसेच त्या युथ फोरम-देवगडच्या देवगड कॉलेज युनिटच्या अध्यक्ष आहेत.
अभिनय, मेहंदी कला, नाट्यक्षेत्र आणि सामाजिक उपक्रम अशा विविध क्षेत्रांत सक्रिय असलेल्या सलोनी यांनी आता मराठी चित्रपटसृष्टीतही आपली पहिली पायरी ठेवली आहे.
ग्रामीण कलाकारांसाठी प्रेरणादायी प्रवास
ग्रामीण भागातील तरुणांमध्ये कलाक्षेत्रात पुढे जाण्याची मोठी क्षमता आहे. मात्र, योग्य संधी आणि व्यासपीठाची आवश्यकता असते. सलोनी कदम यांचा सोशल मीडिया रिल्सपासून रुपेरी पडद्यापर्यंतचा प्रवास हीच बाब अधोरेखित करतो.
देवगडसारख्या ग्रामीण भागातून आलेल्या सलोनी यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर मोठ्या पडद्यावर स्थान मिळवले आहे. त्यांच्या या यशामुळे देवगडच्या कलाक्षेत्राला नवी ओळख मिळण्यासोबतच परिसरातील अनेक नवोदित कलाकारांनाही प्रेरणा मिळणार आहे.