ठिकपूर्ली गावात लाळ खुरकत रोगामुळे; 9 जनावरे दगावली; ७ लाखांचे नुकसान
भोगावती / प्रतिनिधी
ठिकपूर्ली ता.राधानगरी गावातील दुभत्या म्हैशी व गाय जनावरांना लाळ खुरकत रोगाची लागण मोठ्या प्रमाणात झाली आहे.त्यामुळे नऊ जनावरांचा मृत्यू झाला आहे.यामुळे दुध उत्पादकांचे सुमारे ७ लाखांचे आर्थिक नुकसान झाले आहे.ही साथ आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन विभाग व गोकुळ दुध संघाच्या पशुवैद्यकीय विभागाच्यावतीने उपचार सुरू करण्यात आले आहेत.
ठिकपूर्ली येथे गेल्या काही दिवसापासून म्हशी व गायींना लाळ खुरकत रोगाचा प्रादुर्भूत दिसुन येत असल्यामुळें रोग बाधीत जनावरांनी वैरण व पाणी पिणे बंद केले आहे.जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने गुरुवारी ठिकपुर्ली गावातील जनावरांची घरोघरी जाऊन तपासणी केली.यामध्ये ११२ बाधीत जनावरे आढळून आली.तर ५८ जनावरे बरी झाली असून ५९ जनावरांवर उपचार सुरू असल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
याधील काही जनावरांचे रक्त तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.तर यामधील काही जनावरांना थायरेलियामुळे गोचिडताप असल्याचे सांगितले. गोकुळ दुध संघाच्यावतीने गावात लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे.लाळ खुरकत रोगामुळे अजय चौगले,राजाराम चौगले, वसंत पाटील, बाजीराव पाटील, बापुसो चौगले, पांडुरंग मागे,पांडुरंग एकल, धनाजी एकल या पशुपालकांच्या ९ जनावरांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सुमारे ७ लाखांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
यामधील काही जनावरांवर खाजगी डॉक्टरांनी केलेली चुकीची उपचार पद्धती व औषध पाजताना ठसका लागल्याने मृत्यू झाल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. पशुधन वाचविण्यासाठी शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.