साळगाव दुहेरी हत्याकांडचा तपास लवकरच लागेल : मुख्यमंत्री डॉ.सावंत
पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू असल्याचा दावा
पणजी : साळगाव येथे दुहेरी हत्याकांड प्रकरण घडल्यानंतर या प्रकरणाने राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. याबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना विचारले असता त्यांनी साळगाव येथील घटनेचा तपास करण्यासाठी पोलिसांना पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे. त्यामुळे या दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा छडा लवकरच लागेल. या मागील कारणे लोकांसमोर लवकरच येतील, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आपल्याला पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे राज्यात अशी घटना घडल्यानंतर त्याचा योग्य तपास यापूर्वीही केलेला आहे आणि यापुढेही होईल, असेही मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले. राज्यात गुन्हेगारी घटना घडू नयेत, यासाठी लोकांनीही सावध राहणे गरजेचे आहे. घरे भाड्याने देताना भाडेकरूविषयीची संपूर्ण माहिती पोलिसांना द्यायला हवी. कारण आतापर्यंत ज्या गुन्हेगारीच्या घटना घडल्या आहेत त्यात बहुतांश परप्रांतीयांचाच समावेश दिसून आलेला आहे.
राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू
राज्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पुढील तीन महिन्यांसाठी राष्ट्रीय सुरक्षा कायदा (रासुका) लागू करण्यात आला आहे. गुन्हेगारी घटना रोखण्यासाठीच सरकारने राज्यात रासुका लावलेला आहे. ह्या कायद्याअंतर्गत कुणावर कारवाई करावी, याचा निर्णय हा पूर्णपणे पोलिसांचा राहणार आहे. त्यासाठी त्यांना पूर्णपणे स्वातंत्र्यही दिलेले आहे, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.