जूनमध्ये घटली इलेक्ट्रीक कार्सची विक्री
नवी दिल्ली :
मागच्या म्हणजेच जून महिन्यात इलेक्ट्रीक वाहनांच्या विक्रीत म्हणावा तसा ग्राहकांचा प्रतिसाद लाभला नसल्याचे दिसून आले आहे. जून महिन्यात एकंदर 6894 इलेक्ट्रीक कार्सची विक्री देशांतर्गत बाजारात झाल्याची माहिती देण्यात आली आहे. यात टाटा, एमजी मोटर्स, महिंद्रा यांचा विक्रीत वाटा अधिक राहिला आहे.
फाडा या संघटनेने ही माहिती दिली आहे. भारतात इलेक्ट्रीक पॅसेंजर वाहनांची किरकोळ विक्री काहीशी मंदीत दिसून आली. 6894 इलेक्ट्रीक चारचाकी वाहने सदरच्या महिन्यात विक्री झाली आहेत. मागच्या वर्षी
याच महिन्यात 7971 चारचाकी वाहनांची विक्री झाली होती. ही संख्या पाहता यंदा वाहन विक्रीत वर्षाच्या आधारावर पाहता 13 टक्के इतकी घसरण दिसली आहे. मे 2024 मध्ये 7638 इलेक्ट्रीक कार्सची विक्री झाली होती.
कोण आघाडीवर?
टाटा मोटर्सच्या जूनमध्ये 4346 कार्सची विक्री झाली आहे. मे महिन्यात कंपनीने 5083 वाहनांची विक्री केली होती. यानंतर एमजी मोटर्स दुसऱ्या क्रमांकावर असून यांनी जून महिन्यात 1405 वाहनांची विक्री केली होती. वर्षाआधी जून महिन्यात कंपनीने 1160 कार्स विकल्या होत्या. मे 2024 मध्ये कंपनीने 1441 कार्सची विक्री केली होती. तिसऱ्या नंबरवर असणाऱ्या महिंद्रा आणि महिंद्रा यांनी जून महिन्यात 446 कार्स विक्री केल्या आहेत. जून 2023 कंपनीने 423 वाहनांची विक्री केली होती.