दिवाळीच्या खमंग फराळाला पसंती
गृहिणींची लगबग : तयार फराळाचीही विक्री जोरात
बेळगाव : दिव्यांचा सण म्हणून ओळखली जाणारी दिवाळी दोन दिवसांवर आल्याने खरेदीसाठी नागरिकांची लगबग सुरू झाली आहे. दिवाळीच्या सणात फराळावर अधिक भर दिला जातो. त्यामुळे बाजारात पोहे, शेंगा, चिवडा पोहे, चिरमुरे, भाजके पोहे, रवा, मैदा, आटा, बेसन, डालडा, तेल आदी साहित्याची खरेदी होऊ लागली आहे. त्याचबरोबर तयार खमंग फराळालाही पसंती मिळू लागली आहे. त्यामध्ये चकली, करंजी, शंकरपाळ्या, अनारसे, कडबोळी, चिवडा, चिरोटे आदींचा समावेश आहे. यंदा वाढत्या महागाईबरोबर खाद्यतेलांच्या किमतीतही वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य गृहिणीला फराळासाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत.
इतर साहित्याचे दर स्थिर आहेत. बाजारात प्रतिकिलो फुटाणे डाळ 100 ते 130 रु., चिवडा पोहे 75 ते 80, शेंगा 130 ते 150, मका पोहे 70 ते 80, कच्चा चिवडा 60, कांदा पोहे 50, तेल 140 ते 150, रवा 45, मैदा 45, आटा 45, बेसन 140, डालडा 140, गूळ 55 रुपये असा दर आहे. दिवाळीसाठी बाजारपेठ सज्ज झाली आहे. शिवाय काही दिवसांपासून कोसळणारा परतीचा पाऊसही कमी आहे. त्यामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे. दिवाळीच्या इतर साहित्याबरोबर फराळाच्या साहित्याची मागणी वाढत आहे. त्यामुळे बाजारात सर्वसामान्य गृहिणींची लगबग सुरू आहे.
तयार फराळाकडे कल
वाढती महागाई आणि धावपळीच्या जीवनात तयार फराळाला मागणी वाढू लागली आहे. शहराच्या विविध ठिकाणी तयार फराळ विकला जात आहे. काही महिला स्वत: फराळ तयार करून विक्रीसाठी उपलब्ध करत आहेत. पूर्वी घरोघरी फराळ तयार करण्यासाठी लगबग दिसत होती. ते चित्र आता कमी झाले आहे. तयार फराळामध्ये प्रतिकिलो अनारसे 320 रु., चकली 120 रु. ते 200 रु., कडबोळी 140 रु. ते 240 रु., चिवडा 200 रु., चिरोटे 320 रु. ते 400 रु., करंजी 320 रु. असा दर आहे. दिवाळी जवळ आल्याने खमंग फराळासाठी नागरिकांची धडपड सुरू आहे. फराळ तयार करण्यासाठी लागणारे साहित्य आणि काही ठिकाणी तयार फराळाचीही खरेदी केली जात आहे. मात्र, यंदा तेल, डालडा, बेसन, तूप आदी पदार्थांच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत महागाईचा चटका बसणार आहे. अलीकडे रेडिमेड फराळाला मागणी वाढत असल्याने शहरासह उपनगरांतील विविध भागात तयार फराळ विकला जात आहे.