सेल्स फोर्स भारतात करणार विस्तार
टेक फर्मची योजना: हैदराबाद, बेंगळूरसह विविध ठिकाणी 10,000 कर्मचारी रुजू
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टेक जायंट सेल्सफोर्स भारतात विस्तार करण्याच्या विचारात आहे. सदरच्या अमेरिकेतील कंपनीने म्हटले आहे की, भारतातील वाढीला चालना देण्याचा आपला उद्देश आहे, कारण अनेक कंपन्या डिजिटलीकरणात गुंतवणूक करत आहेत आणि कृत्रिम बुद्धिमतेचा योग्य उपयोग करत असल्याचीही माहिती कंपनीने दिली आहे.
कंपनी बेंगळुरू कार्यालयात आपला विस्तार वाढवण्याचा विचार करत आहे. तंत्रज्ञानयुक्त उत्पादने, विक्री, व्यवसाय विस्तार इत्यादी क्षेत्रात भारतात उमेदवारांची भरती करण्यात येत असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे.
अरुंधती भट्टाचार्य, सीईओ आणि चेअरपर्सन, सेल्सफोर्स इंडिया, म्हणाल्या, जनरेटिव्ह एआयच्या आगमनाने, आमच्या बहुतेक ग्राहकांना (कंपन्या) हे समजू लागले आहे की त्यांना पूर्णपणे डिजिटल बनण्याची गरज आहे. ते आमच्यासाठी चांगले असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
यामध्ये टियर-2 आणि टियर-3 शहरांतील पारंपारिक उत्पादन कंपन्या आणि फर्मचा समावेश आहे. आपल्या ग्राहकांना नवीन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या सहाय्याने चांगली सेवा कशाप्रकारे देतात, याचा अभ्यास आगामी काळात कंपनी करेल, असेही भट्टाचार्य यांनी म्हटले आहे.
सेल्सफोर्स इंडियाचा महसूल गेल्या आर्थिक वर्षात 50 टक्क्यांहून अधिक वाढून 6,000.3 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कंपनी व्यवहार मंत्रालयाच्या रजिस्ट्रार ऑफ कंपनीज यांना त्यांनी पाठवलेल्या माहितीतून ही आकडेवारी देण्यात आली आहे. सेल्सफोर्ससाठी भारत ही महत्त्वाची बाजारपेठ आहे. व्यवसायांसाठी विश्वासार्ह डिजिटल सल्लागार म्हणून भारताच्या आर्थिक विकासाला पाठिंबा देण्यावर आमचा भर आहे. एआय क्रांतीमध्ये आघाडीवर राहून, आम्ही जागतिक तंत्रज्ञानात भारताची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी उत्सुक आहोत, असे भट्टाचार्य यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.