बनावट कागदपत्रांद्वारे जमिनीची विक्री
पिरनवाडीच्या एकाची हिंडलगा कारागृहात रवानगी
त. भा. प्रतिनिधी
बेळगाव
बनावट कागदपत्रांच्या साहाय्याने दुसऱ्याची जमीन आपली भासवून तिची विल्हेवाट लावल्याच्या आरोपावरून मार्केट पोलिसांनी पिरनवाडी येथील एका वृद्धाला अटक केली आहे. त्याची रवानगी हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.
लक्ष्मण अर्जुन देसाई (वय 62) राहणार पिरनवाडी असे त्याचे नाव आहे. 10 जानेवारी 2025 रोजी रफिक इमामसाब शहापूरकर (वय 57) राहणार कचेरी गल्ली, उचगाव यांनी मार्केट पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची, उपनिरीक्षक हुसेनसाब केरुर व त्यांच्या सहकाऱ्यांनी या प्रकरणाचा छडा लावून लक्ष्मणला अटक केली आहे.
लक्ष्मण हा मूळचा सिद्धेश्वर गल्ली, पिरनवाडीचा राहणारा असून तो वाहनचालक आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता उचगाव येथील रफिक इमामसाब शहापूरकर यांच्या चुलत्याच्या नावाने असलेल्या जमिनीचा मूळ मालक आपणच असल्याचे सांगत लक्ष्मणने व्यवहार ठरवला होता. उपनोंदणी कार्यालयात वेब कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्याने फोटोही काढून घेतले होते. रफिक यांच्या चुलत्याला फसवण्यासाठीच त्याने हे कृत्य केले होते. मंगळवारी मार्केट पोलिसांनी लक्ष्मणला अटक केली आहे.