अल्मोंट किड सिरपच्या विक्रीवर बंदी
लहान मुलांसाठीच्या औषधांमध्ये आढळले धोकादायक रसायन
वृत्तसंस्था/ हैदराबाद
बाल आरोग्याशी संबंधित एक अतिशय गंभीर आणि धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. तेलंगणातील औषध नियंत्रण प्रशासनाने (डीसीए) मुलांना दिल्या जाणाऱ्या अल्मोंट-किड सिरपच्या विक्रीवर तात्काळ बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे. या सिरपमध्ये इथिलीन ग्लायकोल नावाचे अत्यंत विषारी रसायन आढळून आल्याचे विभागाने या संदर्भात तातडीचा सल्ला जारी केला आहे. कोलकाता येथील सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ) कडून मिळालेल्या प्रयोगशाळेच्या अहवालाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
तेलंगणा येथील ड्रग्ज कंट्रोल अॅडमिनिस्ट्रेशनने लोकांना अल्मोंट किड सिरप वापरणे थांबवण्यास सांगितले आहे. बिहारस्थित कंपनी ट्रायडस रेमेडीजने उत्पादित केलेले बॅच क्रमांक एएल-24002 मधील हे औषध भेसळयुक्त आणि जीवघेणे असल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. हे सिरप सामान्यत: डॉक्टरांकडून मुलांमध्ये अॅलर्जी, ताप आणि दम्यावर उपचार करण्यासाठी लिहून दिले जाते. तपासात सिरपमध्ये इथिलीन ग्लायकोल नावाचे विषारी रसायन आढळले आहे.
डीसीएने जारी केलेल्या नोटीसमध्ये आपल्याला कोलकाता येथील सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ) कडून अलर्ट मिळाल्याचे म्हटले आहे. त्यानुसार जर कोणाकडे हे सिरप असेल तर ते वापरणे त्वरित थांबवावे असे आवाहन डीसीएने जनतेला केले आहे. तेलंगणातील सर्व औषध निरीक्षक आणि सहाय्यक संचालकांना किरकोळ विक्रेते, घाऊक विक्रेते आणि रुग्णालयांना तात्काळ सतर्क राहण्यास आणि कोणत्याही परिस्थितीत या औषधाची विक्री रोखण्यासाठी त्याचा साठा गोठवण्यास सांगण्यात आले आहे.
तपासणीतील निष्कर्ष
तपासणीत असे दिसून आले की सिरपमध्ये इथिलीन ग्लायकोलची पातळी निर्धारित मानकांपेक्षा खूपच जास्त होती. तज्ञांच्या मते, इथिलीन ग्लायकोल हे अँटी-फ्रीझ आणि कूलंटच्या निर्मितीमध्ये वापरले जाणारे एक औद्योगिक सॉल्व्हेंट आहे. जर ते खाल्ले तर ते किडनीचे गंभीर नुकसान, मज्जासंस्थेचे नुकसान आणि विशेषत: मुलांसाठी प्राणघातक देखील ठरू शकते. राज्यातील सर्व औषध निरीक्षकांना मेडिकल स्टोअर्स, औषध वितरक आणि रुग्णालयांमधून या बॅचचा साठा ताबडतोब जप्त करण्याचे आणि त्याची विक्री पूर्णपणे थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कायदेशीर कारवाई सुरू
भेसळयुक्त औषधांचे उत्पादन आणि वितरण करण्यासाठी जबाबदार असलेल्या कंपनीविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीत दोषींना सोडले जाणार नाही, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मुलांच्या औषधांच्या या भेसळीमुळे देशाच्या औषध नियामक व्यवस्थेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. सार्वजनिक आरोग्याशी तडजोड केली जाणार नाही, असे प्रशासनाने स्पष्टपणे सांगितले आहे. लोकांच्या सोयीसाठी, एक टोल-फ्री क्रमांक जारी करण्यात आला आहे. लोक कोणत्याही संशयास्पद औषधासंबंधीची त्वरित तक्रार टोल फ्री नंबरवर करू शकणार आहेत.