kolhapur : राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांचा वेतनप्रश्न कायम
वेतनवाढीच्या घोषणेनंतरही एनएचएम कर्मचाऱ्यांचे वेतन अद्याप थकले
कोल्हापूर : राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मानधनात १५ टक्के वाढ करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने नुकताच जाहीर केला आहे. मात्र, या निर्णयाच्या घोषणेसोबतच दोन महिन्यांचे वेतन रखडल्याने कर्मचारी वर्गामध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
डॉक्टर, परिचारिका, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, तसेच डायलिसिस टेक्निशियन अशा विविध विभागांतील कर्मचाऱ्यांचे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांचे वेतन अद्याप न मिळाल्याने आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांनी दिवाळीच्या काळातच आंदोलनाचा इशारा दिला आहे. आरोग्य विभागाच्या निर्णयात मानधनवाढीचा आनंद असला तरी प्रत्यक्षात वेतन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांना 'आनंदाऐवजी नाराजी व्यक्त करावी लागत आहे.
त्यामुळे दिवाळीपूर्वी वेतन दिले नाही, तर कोल्हापूर येथील आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या निवासस्थानासमोर किंवा मुंबईतील आरोग्य आयुक्तालयासमोर प्रतीकात्मक दिवाळी साजरी करण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, "वेतनवाढीची घोषणा स्वागतार्ह आहे, पण दोन महिन्यांपासून थकलेले वेतन देणे हीच खरी दिवाळीची भेट ठरेल." दरम्यान, आरोग्य विभागाकडून यासंदर्भात कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही.