स्वत:ची अपत्ये सांभाळण्यासाठी वेतन
आपल्याकडे घरची कामे महिलांनी करायची, अशी प्रथा आजही आहे. स्वयंपाक करणे, स्वत:च्या मुलांना सांभाळणे, त्यांना शिकविणे इत्यादी कामे त्यांच्या माता घरी बसून आनंदाने करतात, अशी व्यवस्था अनेक कुटुंबांमध्ये असते. हे स्वत:च्या घरचेच काम असल्याने त्याचे वेतन घ्यावे, अशी कल्पनाही केली जात नाही.
तथापि, अमेरिकेत अँबर औब्रे नामक एक महिला आपल्या स्वत:च्या मुलांचे संगोपन करण्याचे वेतन आपल्या पतीकडून घेत आहे. घरकाम करणे हा जणू तिचा व्यवसाय आहे. ती अन्यत्र कोठे नोकरी करत नाही, तसेच तिचा कोणताही व्यवसाय नाही. तिला तिच्या पतीपासून झालेली मुले सांभाळण्यासाठी आणि घरकाम करण्यासाठी ती पतीकडून वेतन घेते. हे वेतनही आपल्या भारतीय रुपयाच्या माध्यमात पाहिले तर भरभक्कम आहे. तिला या कामाचे पतीकडून एका महिन्याला 3 हजार डॉलर्स, म्हणजे जवळपास अडीच लाख रुपये मिळतात. जेव्हा आपल्या पतीला त्याचे वेतन मिळते, तेव्हा तो माझेही वेतन चुकते करतो, असे या महिलेचे म्हणणे आहे. त्यांच्या कुटुंबातील ही व्यवस्था केवळ एवढ्यावरच थांबत नाही. या महिलेने आपल्या प्रत्येक घरकामाचा स्वतंत्र दर ठरविला आहे. भांडी स्वच्छ करण्यासाठी महिन्याला 300 डॉलर्स, कपडे धुण्यासाठी महिन्याला 140 डॉलर्स, वॉशरुमच्या स्वच्छतेसाठी महिन्याला 240 डॉलर्स असा प्रत्येक कमाचा वेगवेगळा दर आहे. एकंदर ही रक्कम 3 हजार डॉलर्स प्रतिमहिना इतनी होते. या कामांपैकी काही कामे जर पतीने केली, तर तो त्यांचे पैसे या दरांप्रमाणे स्वत:कडे ठेवून घेतो. ही व्यवस्था अमेरिकेसारख्या देशातही चर्चेचा विषय आहे, हे विशेष !