For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इमाम, पाद्रींना 12 हजार रुपयांचे वेतन

05:03 AM Nov 11, 2023 IST | Tarun Bharat Portal
इमाम  पाद्रींना 12 हजार रुपयांचे वेतन
Advertisement

काँग्रेसचे तेलंगणात ‘अल्पसंख्याक घोषणापत्र’ जारी

Advertisement

तेलंगणात 30 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानापूर्वी काँग्रेसने मोठे आश्वासन दिले आहे. राज्यात सत्तेवर आल्यास 6 महिन्यांच्या आत जातनिहाय सर्वेक्षण करविण्यात येणार आहे. याचबरोबर अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठीचा निधी वाढवून वर्षाकाठी 4 हजार कोटी रुपये केला जाणार असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. काँग्रेसने ‘अल्पसंख्याकांचे घोषणापत्र’ जारी करत पक्ष नोकरी, शिक्षण आणि शासकीय योजनांमध्ये अल्पसंख्याकांसमवेत सर्व मागास वर्गांसाठी योग्य आरक्षण निश्चित करणार असल्याचे जाहीर केले आहे. याचबरोबर काँग्रेसने अल्पसंख्याक समुदायातील बेरोजगार युवक आणि महिलांना सवलतीच्या दरात कर्ज प्रदान करण्यासाठी दरवर्षी 1 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याचे आश्वासन दिले आहे.

अब्दुल कलाम तोहफा-ए-तालीम योजनेच्या अंतर्गत मुस्लीम, ख्रिश्चन, शीख आणि अन्य अल्पसंख्याक समुदायांच्या युवांना एम.फिल आणि पीएचडीचे शिक्षण पूर्ण केल्यावर 5 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य प्रदान करणार असल्याचे पक्षाने म्हटले आहे. घोषणापत्रात इमाम, मुअज्जिन, खादिम, पाद्री आणि ग्रंथी समवेत सर्व धर्मांच्या पुजाऱ्यांसाठी 10 हजार रुपयांपासून 12 हजार रुपयांचे मासिक मानधन देण्याचे आश्वासन पक्षाकडून देण्यात आले आहे.

Advertisement

पक्षाने उर्दू माध्यमाच्या शिक्षकांची विशेष भरती करण्यासमवेत तेलंगणा शीख अल्पसंख्याक आर्थिक महामंडळ स्थापन करण्याचे आश्वासन दिले आहे. याचबरोबर अल्पसंख्याक समुदायांच्या बेघर लोकांना घर बांधण्यासाठी जागा आणि 5 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. अल्पसंख्याक समुदायाच्या नवविवाहित जोडप्यांना 1.6 लाख रुपयांची मदत करणार असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.

Advertisement
Tags :

.