‘सलाम वेंकी’ 9 डिसेंबरला होणार प्रदर्शित
काजोलने शेअर केले चित्रपटाचे पोस्टर
अभिनेत्री काजोलने गुरुवारी स्वतःच्या सोशल मीडिया हँडलवर स्वतःचा आगामी चित्रपट ‘सलाम वेंकी’चे पोस्टर शेअर केले आहे. पोस्टरमध्ये विशाल जेठवा अन् काजोल स्वतःच्या व्यक्तिरेखांमध्ये दिसून येत आहेत. रेवती यांच्या दिग्दर्शनात तयार झालेला हा चित्रपट 9 डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. रेवती यांना ‘मित्र’, ‘माय प्रेंड’ आणि ‘फिर मिलेंगे’ यासारख्या चित्रपटांच्या दिग्दर्शनासाठी ओळखले जाते.
‘एक मोठय़ा जीवनाचे मोठे सेलिब्रेशन सुरू होणार आहे. सलाम वेंकीचा ट्रेलर 14 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. 9 डिसेंबर रोजी केवळ चित्रपटगृहांमध्ये सुजाता आणि वेंकटेशची अश्विसनीय यात्रा पहा’ असे काजोलने पोस्टर शेअर करत म्हटले आहे.
या चित्रपटाचे नाव पूर्वी ‘द लास्ट हुर्रा’ ठेवण्यात आले होते. काजोलचे ऊर्जावान डोळे आणि तिचे सौंदर्यवान हास्य काहीही शक्य आहे असा विश्वास देण्यास समर्थ आहेत. चित्रपटातील सुजाता व्यक्तिरेखा देखील अशाचप्रकारची आहे असे रेवती यांनी म्हटले आहे.
या चित्रपटाची निर्मिती बीलाइव्ह प्रॉडक्शन्स आणि आरटेक स्टुडिओजच्या बॅनर अंतर्गत सूरज सिंह, श्रद्धा अग्रवाल आणि वर्षा कुकरेजा यांच्याकडून करण्यात आली आहे. काजोल यापूर्वी त्रिभंगा या चित्रपटात दिसून आली होती. तर लवकरच ती डिस्ने प्लस हॉटस्टारवर ‘द गुड वाइफ’च्या हिंदी रिमेक वेबसीरिजमध्येही झळकणार आहे.