साक्षी, जस्मिन, नुपूर यांना सुवर्णपदके
विश्वचषक मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताला अकरा पदके
वृत्तसंस्था/ अॅस्टेना (कझाकस्तान)
येथे नुकत्याच झालेल्या विश्व मुष्टीयुद्ध फेडरेशनच्या विश्वचषक मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारतीय स्पर्धकांनी दर्जेदार कामगिरी करताना एकूण अकरा पदकांची कमाई केली. या स्पर्धेत भारताचीही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. महिला मुष्टीयोद्ध्या साक्षी, जस्मिन आणि नुपूर यांनी सुवर्णपदके पटकाविली.
महिलांच्या 54 किलो वजन गटातील अंतिम लढतीत साक्षीने अमेरिकेच्या पेरेझचा एकतर्फी पराभव करत सुवर्णपदक मिळविले. तर 57 किलो वजन गटात भारताच्या जस्मिनने ब्राझीलच्या ज्युसेलीन रोमूचा 4-1 अशा गोलफरकाने पराभव केला. महिलांच्या 80 किलोवरील वजन गटात भारताच्या नुपूरने कझाकस्तानच्या टेलीपोह्यावर 5-0 असा एकतर्फी विजय मिळवित सुवर्णपदक घेतले. या स्पर्धेत भारताने तीन सुवर्ण, पाच रौप्य आणि तीन कास्यंपदके अशी एकूण 11 पदके पटकाविली. विश्व चषक मुष्टीयुद्ध स्पर्धेचा ब्राझीलमध्ये झालेल्या टप्प्यात भारताने 1 सुवर्ण, 1 रौप्य आणि 4 कास्य अशी एकूण 6 पदके मिळविली होती.
रविवारी या स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी साक्षीने आपल्या जबरदस्त ठोशांच्या जोरावर अमेरिकेच्या पेरेझचा 5-0 असा फडशा पाडत सुवर्णपदकाला गवसणी घातली. तर 57 किलो गटातील अंतिम लढतीत जस्मिनला ब्राझीलच्या रोमूने तिसऱ्या आणि अंतिम फेरीपर्यंत कडवी लढत दिली. 48 किलो वजन गटात मिनाक्षीला कझाकस्तानच्या केझाबेने 2-3 अशा गुणांनी पराभूत केल्याने तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. पुरूषांच्या विभागात 85 किलो गटात जुगनूने, महिलांच्या 80 किलो गटात पूजा राणीने, पुरूषांच्या 70 किलो गटात हितेश गुलीयाने तर पुरूषांच्या 65 किलो गटात अभिनाश जमवालने रौप्यपदके पटकाविली. भारताच्या हितेशला ब्राझीलच्या ऑलिव्हेराने 0-5 असे पराभूत केले. महिलांच्या 60 किलो गटात संजूने, पुरूषांच्या 75 किलो गटात निखील दुबेने तर पुरूषांच्या 90 किलोवरील गटात नरेंद्रने कास्यपदक पटकाविले.