Kolhapur News: साके येथे 40 असाक्षर गावकऱ्यांनी दिली परिक्षा, उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रम
केंद्रावर या निराक्षरांच्या परिक्षांची बैठक व्यवस्था करण्यात आली होती
By : सागर लोहार
व्हनाळी : उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रम भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने सुरू केलेला एक महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश देशातील प्रौढ निरक्षर लोकसंख्येला साक्षर बनवणे, डिजिटल साक्षरता वाढवणे आणि जीवनोपयोगी कौशल्ये विकसित करणे हा आहे.
१५ वर्षे व त्यापेक्षा जास्त वयोगटातील असाक्षर व्यक्तींना वाचन, लेखन संख्याज्ञान यासारख्या मूलभूत कौशल्यांची माहिती देणेसाठी हि परिक्षा घेण्यात आली. एकूण १५० पैकी ४९.५ गुण उतीर्ण होणेसाठी आवश्यक असून उतीर्ण झालेल्यांना प्रमाणपत्र/गुणपत्रक मिळणार आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व माध्यमिक हायस्कुल मध्ये निराक्षरांची परिक्षा घेण्यात आल्या.
यावेळी विद्यार्थ्यांच्या परीक्षेप्रमाणे केंद्रावर या निराक्षरांच्या परिक्षांची बैठक व्यवस्था करण्यात आली होती. रविवार सुट्टी दिवशी ह्या परिक्षांसाठी सकाळपासून परीक्षाकेंद्रावर निराक्षर स्त्री, पुरूषांनी हजेरी लावली. साके (ता. कागल) येथील कै. सौ. सुभद्रामाता हायस्कुलमध्ये १९ तर विद्या मंदिर प्राथमिक शाळेत २१ अशा एकुण ४० निराक्षरांनी आज परिक्षा दिली.
हायस्कुलचे मुख्याध्यापक दतात्रय ससे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक राजू डोंगळे, विजय पाटील, धनाजी माने, रामदास पाटील, विद्या पोवार, टि.व्ही.पाटील, पी.एच.पाटील, तानाजी सामंत, डी.एस.पाटील, व्ही.टी. किल्लेदार आदी शिक्षक उपस्थित होते.
चित्र रोजचेच, कृतीविरोधी..
नेहमी आपल्या नातवंडाना शाळेत सोडण्यासाठी जाणारे आजी-आजोबा पहायला मिळत होते. मात्र आज उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमाच्या निमित्ताने आजी-आजोबांना परिक्षेसाठी नातवंडेच त्यांना शाळेकडे घेवून जाताना दिसत होते. त्यामुळे नेहमीच्या परिक्षांपेक्षा आज आजी-आजोबांची परिक्षा नातवंडाना पहायला मिळाली.