कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सकल मती प्रकाशु...

06:22 AM Aug 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मांगल्य, चैतन्य, आनंद आणि सर्वसमावेशकतेचे प्रतीक असलेल्या गणेशोत्सवाला देशभरात आजपासून अतिशय उत्साहात प्रारंभ होत आहे. भारतीय संस्कृतीत सण, उत्सवांना विशेष महत्त्व आहे. हे सण, उत्सव मरगळलेल्या, हताश झालेल्या व दु:खी मनांना उभारी देतानाच आसमंतात एक वेगळीच ऊर्जा निर्माण करतात. गणराय हे तर सान, थोर सर्वांचेच लाडके दैवत. त्यामुळे पुढचे दहा दिवस गणेशभक्तांसाठी भारलेलेच असतील. गणपती ही कलेची, विद्येची वा बुद्धीची देवता म्हणून ओळखली जाते. म्हणूनच देवा तुचि गणेशु । सकल मति प्रकाशु ।। अशा शब्दांत गणरायाचे वर्णन करण्यात येते. हा देव गजानन सुखकर्ता आणि द़ु:खहर्ता म्हणूनही सर्वांना परिचित आहे. स्वाभाविकच आद्यपूजेचा मान या देवतेसच मिळतो. कोणत्याही मंगल कार्याचा आरंभ श्री गणेशाच्या साक्षीने करण्याची परंपरा पिढ्यान् पिढ्या सुरू आहे. कोकण, महाराष्ट्रासह इतर भागात घरोघरी गणपती बसवण्याची प्रथा पूर्वापार चालत आली आहे. तर पुण्यात मुहूर्तमेढ रोवण्यात आलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवालाही आता अतिशय भव्यदिव्य व व्यापक स्वऊप प्राप्त झाल्याचे दिसते. या उत्सवाला सार्वजनिक ऊप देण्यात लोकमान्य टिळक यांच्यासह भाऊसाहेब रंगारी तसेच घोटावडेकर, खासगीवाले या सर्वांनी अमूल्य योगदान दिल्याचे अभ्यासक सांगतात. स्वातंत्र्यलढ्याच्या दृष्टीकोनातून गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाज एकत्र यावा, संघटित व्हावा, ही लोकमान्यांची अपेक्षा होती. आज संख्यात्मकदृष्ट्या विचार केला, तर समाज मोठ्या प्रमाणात एकत्र येतो. पुणे, मुंबईसह अनेक शहरांमध्ये मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होतो. गणेश आगमन आणि विसर्जनाच्या दिमाखदार मिरवणुका निघतात. या मिरवणुकांमधील आकर्षक रथ, नेत्रदीपक रोषणाई, विविध वाद्य पथके, डिजेंचा दणदणाट, त्या तालावर डोलणारे गणेशभक्त यामुळे डोळे दीपून जातात. पण, या सगळ्या गर्दीमध्ये गणेशोत्सवाचा मूळ उद्देsश तर हरवत चालला नाही ना, असा प्रश्न उपस्थित होतो. गणरायाचे स्वागत दणक्यात व्हावे. त्याचबरोबर लाडक्या गजाननाला निरोपही असाच धडाक्यात द्यावा, अशी अपेक्षा असण्यात काही गैर नाही. पण, तिथेही काही गोष्टींचे तारतम्य बाळगायला हवे. काही गणेश मंडळे निश्चितपणे हे भान बाळगताना दिसतात. देखाव्यांच्या माध्यमातून समाजाच्या जगण्यामरण्याशी संबंधित विषयावर जागृती घडवतात. त्याचबरोबर वेगवेगळ्या विधायक उपक्रमांतून लोकहिताची, समाजहिताची भूमिका घेतात. या मंडळांचे नक्कीच कौतुक करायला हवे. खरे तर आपल्या पूर्वसुरींची हीच अपेक्षा होती. म्हणूनच शहराशहरातील गणेश मंडळांनी उत्सव समाजाभिमुख करण्याकरिता तसेच शांततेत व निर्विघ्नपणे पार पाडण्याकरिता पुढाकार घ्यायला हवा. पुण्याचा गणेशोत्सव जगभरात प्रसिद्ध आहेत. पारंपरिक वाद्ये, मनमोहक रथ आणि सामाजिक संदेश देणाऱ्या देखाव्यांमुळे पुण्याची मिरवणूक वैशिष्ट्यापूर्ण ठरते. तथापि, मिरवणूक 26 ते 28 किंवा त्यापेक्षा अधिक  विक्रमी वेळेपर्यंत चालते. त्यामुळे मागच्या काही वर्षांपासून ही मिरवणूक वेळेत पार पाडण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्याला काही प्रमाणात यशही येताना दिसते.  मानाच्या गणपती मंडळांसह अनेक मंडळांनी त्याकरिता पुढाकार घेतल्याचे पहायला मिळते. अनेक मंडळांनी आपल्या मिरवणुकीतील पथकांची संख्याही कमी केली आहे. पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने दोन वर्षांपूर्वी चार वाजता मिरवणुकीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. इतर मंडळेही हाच दृष्टीकोन ठेऊन  मिरवणुकीत सहभागी होत आहेत. हे सर्वांसाठीच आदर्शवत ठरावे. मंडळाचे कार्यकर्ते वा पदाधिकारी हा उत्सवाचा गाभाच म्हणता येईल. मुख्य म्हणजे उत्सवाची सगळी जबाबदारी त्यांच्याकडेच असते. ही जबाबदारी पेलताना त्यांनी सामाजिक भान बाळगणे महत्त्वाचे होय. त्यातूनच हा उत्सव अधिकाधिक परिपूर्ण करता येईल. म्हणूनच गुलाल उधळणे, डिजेचा दणदणाट याला कसा फाटा देता येईल, यावर भर असायला हवा. त्याचबरोबर गणेशोत्सव पर्यावरणपूरक करण्याकरिताही प्रत्येकाने वाटा उचलायला हवा. खरे तर गणपती ही अद्भुत देवता आहे. गणरायाच्या मूर्तीविषयी प्रत्येकाला एक आपलेपणा वाटतो. म्हणूनच आकार चरण युगुल । उकार उदर विशाल । मकार महामंडल । मस्तकाकारे।। हे तिन्ही एकवटले। तेच शब्दब्रम्ह प्रगटले । ते मियां गुऊकृपा नमिले । आदिबीज ।। असे संत ज्ञानेश्वर माउलींनी म्हटले आहे. यातला मथितार्थ समजून घ्यायला हवा. यू ट्यूबर अथर्व सुदामे हा आपल्या व्हिडिओतून कायम सामाजिक संदेश देत असतो. त्यामुळे त्याचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर बघितले जातात. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर त्याने आपल्या व्हिडिओतून हिंदू मुस्लीम एकोप्याचा संदेश दिला. तथापि, काही कर्मठ मंडळींना तो खटकला. त्यामुळे या टोळधाडीने अथर्वविरोधात मोहीम सुरू केली. तथापि, यातून एक समाज म्हणून आपण कुठे चाललो आहोत, असाच प्रश्न पडतो. खरे तर समाज एकजूट व्हावा म्हणूनच लोकमान्यांनी तसेच अन्य समाजधुरिणांनी गणेशोत्सवाला सार्वजनिकीकरण केले. पण, त्यांचा मूळ विचार सोडून आज भलत्याच गोष्टींना हिंदूत्वाचे लेबल लावले जात आहे. अशांची कीव करावी तेवढी थोडीच. अथर्व सुदामे याने आपल्या व्हिडिओतून चांगला संदेश दिला. मात्र, टोळधाडीच्या दबावामुळे त्याने आपला व्हिडिओ डिलिट करणे पसंत केले, हेही कलावंत म्हणून अयोग्यच म्हणता येईल. कलावंताने आपल्या भूमिकेवर कायम ठाम असायला हवे. मुख्य म्हणजे ही भूमिका समाजाच्या हिताची असेल, त्यामध्ये कोणताही द्वेषभाव नसेल, तर त्यावर ठाम असायलाच हवे. त्याचबरोबर समाजानेही याबाबत प्रगल्भ दृष्टीकोन ठेऊन ज्याला त्याला वैचारिक मोकळीक द्यायला हवी. असाच समाज परिपक्व ठरू शकतो. गणराय ही बुद्धीची देवता आहे. त्यामुळे गणरायानेच अशांना बुद्धी द्यावी. त्यांच्या डोक्यात प्रकाश पाडावा. यंदा गणेशोत्सव काळात काही भागांत पावसाचीही शक्यता आहे. त्याचबरोबर यंदा नेहमीपेक्षा अधिक गर्दी होऊ शकते, हे गृहीत धरून नियोजन करणे क्रमप्राप्त असेल.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article