Maratha Reservation: आंदोलनाला रसद पुरवा, अन्यथा कोंडी करु, सकल मराठा समाजाचा इशारा
अन्यथा लोकप्रतिनिधींची आम्ही कोंडी करू, सकल मराठा समाजाचा इशारा
कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना राज्यभरातील खासदार, आमदारांनी रसद पुरवावी. अन्यथा लोकप्रतिनिधींची आम्ही कोंडी करू, असा इशारा मराठा महासंघाचे उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी दिला. सकल मराठा समाजाच्या वतीने शनिवारी राजर्षी शाहू स्मारक भवन येते आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी परखड प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
मुंबईला जाण्यासाठी रविवारपासून रेल्वेच्या नोंदी केल्या जाव्यात, असेही यावेळी सांगण्यात आले. ज्यांनी लाभ घेतला आहे, त्यांनी या लढाईत सहभागी व्हावे. ‘जरांगे यांच्यासोबत लढेंगे जितेंगे, हम सब जरांगे“ असा ठराव बैठकीत केला. मुंबईतील आंदोलन टिकवायचे असेल तर रसद पुरवणे गरजेचे आहे. ट्रकमधून कोरडा शिधा देण्यात येणार आहे. यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढे यावे असे आवाहन केले.
‘आप“चे संदीप देसाई म्हणाले, सरकारने निवडणुकीपूर्वी आरक्षण देतो म्हणून सांगितले, पण मराठा समाजाची फसवणूक केली. सरकारने दडपशाही, कोंडी सुरू केली, पण आपण सर्वजण मिळून त्यांचे कटकारस्थान हाणून पाडू. दिलीप सावंत म्हणाले, आंदोलकांची सरकारने गैरसोय केली असल्याने आपल्यालाच आता त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करावी लागणार आहे.
अनिल घाटगे म्हणाले, दोन उपमुख्यमंत्री मराठा समाजाचे आहेत पण ते फक्त नावालाच आहेत. एकही मराठा नेता मराठा आरक्षणासाठी बोलत नाही. त्यांनी जाहीर भूमिका घेण्याची गरज आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी न्यायालयात जाणूनबुजून मराठा आरक्षणाची बाजू मांडू दिली नाही, असे वक्तव्य आशुतोष कुंभकोणी यांनी केल्याचा दाखला दिला.
स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे रुपेश पाटील यांनी आरक्षण मिळवण्यासाठी समाजाने शिक्षित होणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले. या बैठकीत शशिकांत पाटील, बाबा महाडिक, रुपेश पाटील, शाहीर दिलीप सावंत, संयोगिता देसाई, शैलजा भोसले, अभिजित कांजर, राजू सूर्यवंशी, योगेश पाटील, धनराज आमते, राहुल इंगवले, सुनीता पाटील, शुभम शिरहटी, सुधा सरनाईक, गीता हासुरकर, संपतराव चव्हाण, उदय लाड, उत्तम पाटील, राजू सावंत, चंद्रकांत पाटील, उमेश पोवार, शिवराजसिंह गायकवाड, नीलेश चव्हाण आदी हजर होते.
कोल्हापुरातून कोरडा शिधा जाणार मुंबईत लाखो मराठा बांधव आंदोलन करत आहेत. या आंदोलकांची सरकारकडून कोंडी केली जात आहे. इतकेच काय गणेश मंडळांचा महाप्रसाद सुद्धा बंद केला आहे. यामुळे आपल्या बांधवासाठी आपणच पुढे येण्याची गरज असून कोल्हापुरातून ट्रकमधून कोरडा शिधा पाठवण्यात येणार आहे. यासाठी केंद्र उभारण्यात येणार आहे.
तसेच मुंबईला जाण्यासाठी रेल्वे सोयीस्कर असून रेल्वेचे बुकिंग करावे, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.
रेनकोट, छत्रीची गरज सध्या राज्यात पाऊस सुरु आहे. अशा पावसात मुंबईतील आझाद मैदानासह इतर ठिकाणी मराठा बांधव आंदोलन करत आहेत. त्यांना रेनकोट, छत्रीची गरज आहे. यामुळे कोल्हापुरातून त्यांना रेनकोट, छत्री पुरवण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले.