साजिद, नौमनचा भेदक मारा, स्मिथचे अर्धशतक
वृत्तसंस्था/रावळपिंडी, पाकिस्तान
पाक व इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या व निर्णायक कसोटीचा पहिला दिवस गोलंदाजांनी गाजवला. पाकच्या साजिद खानने 6 तर नौमन अलीने 3 बळी घेत केलेल्या भेदक माऱ्यामुळे इंग्लंडने पहिल्या डावात 68.2 षटकांत सर्व बाद 267 धावा जमविल्या. बेन डकेट, जेमी स्मिथ यांनी अर्धशतके झळकवली. त्यानंतर पाकने दिवसअखेर 3 बाद 73 धावा जमविल्या असून ते अद्याप 194 धावांनी मागे आहेत. कोरड्या व फिरकीस अनुकूल खेळपट्टीवर दिवसभरात एकूण 13 बळींची नोंद झाली.
साजिद खानने 128 धावांत 6 बळी टिपले तर नौमन अलीने 88 धावांत 3 बळी मिळविले. प्रथम फलंदाजी निवडल्यावर उपाहारापर्यंत इंग्लंडची स्थिती 5 बाद 110 अशी झाली होती. पण अखेरच्या टप्प्यात जेमी स्मिथने तळाच्या सहकाऱ्यांची साथ घेत शानदार अर्धशतक नोंदवत संघाला अडीचशे पारची मजल मारून दिली. यष्टिरक्षक स्मिथने शेवटच्या चार फलंदाजांच्या साथीने 149 धावांची भर घातली. स्मिथने 119 चेंडूंच्या खेळीत 6 उत्तुंग षटकार व 5 चौकारांसह 89 धावा फटकावल्या. स्पिनर झाहिद मेहमूदच्या गोलंदाजीवर तो चहापानाआधीच्या शेवटच्या षटकात झेलबाद झाला. चहापानानंतर साजिदने रेहान अहमदला 9 धावांवर बाद करून तिसऱ्यांदा पाच बळींची नोंद केली. नंतर त्याने जॅक लीचला 16 धावांवर बाद करून सहावा बळी मिळविला.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड प.डाव सर्व बाद 267 : क्रॉली 29, डकेट 52, जेमी स्मिथ 89, अॅटकिन्सन 39, लीच 16, साजिद खान 6-128, नौमन अली 3-88, झाहिद मेहमूद 1-44. पाकिस्तान प.डाव 23 षटकांत 3 बाद 73 : शफीक 14, आयुब 19, मसूद खेळत आहे 16, गुलाम 3, शकील खेळत आहे 16, लीच 1-33, अॅटकिन्सन 1-2, बशीर 1-29.