For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय संघाच्या प्रशिक्षक ताफ्यात साईराज बहुतुले

06:14 AM Jun 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारतीय संघाच्या प्रशिक्षक ताफ्यात साईराज बहुतुले
Advertisement

वृत्तसंस्था, मुंबई

Advertisement

भारताचा माजी फिरकी गोलंदाज साईराज बहुतुलेची भारतीय क्रिकेट संघाच्या फिरकी गोलंदाज प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारत आणि अफगाण यांच्यातील एकमेव कसोटी 6 ते 10 जून दरम्यान चंदीगडमध्ये खेळविली जाणार आहे. या कसोटीवेळी तो भारतीय संघाला गोलंदाजीचे मार्गदर्शन करेल.

53 वर्षीय साईराज बहुतुलेने प्रशिक्षक क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर आयपीएल स्पर्धेतील किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा तो प्रशिक्षक होता. साईराजला प्रशिक्षक क्षेत्रातील मोठा अनुभव असल्याने त्याने केरळ, बंगाल या संघांनाही मार्गदर्शन केले आहे. 2018 ते 2021 या कालावधीत राजस्थान रॉयल्स संघाचा तो प्रशिक्षक म्हणून कार्यरत होता. त्यानंतर तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये दाखल झाला आणि त्याने भारतीय अ संघाला आपल्या सहकारी प्रशिक्षकांसमवेत मार्गदर्शन केले. 2025 च्या आयपीएल हंगामात राजस्थान रॉयल्स संघाच्या प्रशिक्षक चमुमध्ये त्याचा समावेश करण्यात आला होता.

Advertisement

1997 ते 2003 या कालावधीत साईराज बहुतुलेने 2 कसोटी आणि 8 वनडे सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. मात्र राष्ट्रीय क्रिकेटमध्ये तब्बल दशकाच्या कालावधीत त्याने 188 प्रथमश्रेणी सामन्यात 630 बळी मिळविले. आता भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकवर्गामध्ये प्रमुख प्रशिक्षक गौतम गंभीर, फलंदाज प्रशिक्षक सितांशू कोटक, वेगवान गोलंदाज प्रशिक्षक मॉर्नी मॉर्कल, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप आणि साहाय्यक प्रशिक्षक रेयान टेन डुशेट समवेत बहुतुले भारतीय संघाला मार्गदर्शन करेल. सध्या विश्व कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धांतर्गत भारताने 9 सामन्यांपैकी चार सामने जिंकले असून चार सामने गमविले आहेत तर एक सामना अनिर्णीत राहिला असून भारत मानांकनात सहाव्या स्थानावर आहे.

Advertisement
Tags :

.