साधुसंतांची जागा ईश्वराच्या शेजारी असते
अध्याय पाचवा
बाप्पा म्हणाले, देहबुद्धी नष्ट झालेला योगी, निर्विचार झालेला असल्याने त्याचे मन स्थिर असते. त्याला पराकोटीचे वैराग्य प्राप्त झालेले असल्याने सूक्ष्म बुद्धीने तो ईश्वर स्वरूपाचे दर्शन घेत असतो. सर्वोच्च लाभ प्राप्त झाल्याने त्याला बाह्य सुखदु:खाची जाणीव होत नसते.
आत्म्याचे परमात्म्याशी मिलन होण्याची स्थिती तो सदोदित अनुभवत असतो. त्याला स्वत:तल्या ईश्वराची उपस्थिती तर जाणवत असतेच पण आजूबाजूच्या व्यक्ती व वस्तुत असलेला ईश्वरही स्पष्ट दिसत असतो. असा जो दृश्य जगतातल्या विषयांची आकर्षणे लाथाडून, अथक प्रयत्नाने माझ्यापर्यंत पोहोचतो, त्याच्याबद्दल मला अत्यंत आदर वाटत असल्याने मीही त्याच्याकडे खेचला जातो. मी त्याला कधीही सोडत नाही तसेच तोही माझ्यापासून दूर जात नाही ह्या अर्थाचा योगेन यो मामुपैति तमुपैम्यहमादरात् । मोचयामि न मुञ्चामि तमहं मां स न त्यजेत् ।। 16 ।। हा श्लोक आपण अभ्यासत आहोत.
जो बाप्पांच्यावर पूर्ण श्रद्धा ठेऊन त्यांच्या सांगण्यानुसार, योगाभ्यास करतो, त्यांची भक्ती ठेवतो तो त्याच्या आत्म्याचे परमात्म्याशी मिलन होण्याच्यादृष्टीने पुढे सरकत असतो. ईश्वराला असा भक्त अत्यंत प्रिय असल्याने त्यांच्यातील आणि भक्तातील अंतर कमी व्हावे म्हणून साधक एक पाउल टाकून पुढे आला तर ईश्वर त्याच्या दिशेने दहा पाउले टाकून त्याच्याकडे धावत येतो. तो त्याला कधीही अंतर देत नाही. ह्यावर साधकाने पूर्ण विश्वास ठेवावा. त्याची आणि ईश्वराची भेट झाल्यावर ईश्वर त्याला स्वत:जवळ मोठ्या प्रेमाने ठेऊन घेतात.
लोककल्याणकारी कार्यासाठी ईश्वराच्या सांगण्यावरून त्याला कधी पृथ्वीवर जन्म घ्यावा लागला तरी तो त्याच्या मर्जीनुसार येतो आणि परत जातो. महान योगी आणि साधुसंत हे जरी आपल्याला देहाने इथे वावरत असलेले दिसले, लोककल्याणकारी कार्ये करत असलेले दिसले तरी त्यांची जागा ईश्वराच्या शेजारी असते. ते करत असलेले चमत्कार ह्या केवळ बाह्य गोष्टी असतात काही ना काही निमित्त होऊन जास्तीतजास्त माणसांना ईश्वराचे महत्त्व पटवून देऊन त्यांना त्यांची भक्ती करायला लावणे हेच त्यांच्या जीवनाचे मुख्य उद्दिष्ट असते. ते पूर्ण झाले की, ते परत ईश्वराच्या सान्निध्यात राहण्यासाठी निघून जातात. ह्या सगळ्या कालखंडात ते ईश्वराच्या मूळ स्वरूपाला कधीही विसरत नसल्याने मी कर्ता आहे हा विचार त्यांना कधीही शिवत नाही. आपण करत असलेल्या चमत्काराच्या पाठीमागे ईश्वरी शक्ती कार्यरत असते ह्याची त्यांना सदोदित जाणीव असते म्हणून ते कोणत्याही गोष्टीचे कर्तृत्व स्वत:कडे घेत नाहीत. संत चरित्रातील विविध प्रसंग अभ्यासले की, ही जाणीव प्रकर्षाने होते.
साधक, सर्वांच्यात ईश्वराचा वास आहे हे कशामुळे जाणतो ते बाप्पा पुढील श्लोकात सांगत आहेत.
सुखे सुखेतरे द्वेषे क्षुधि तोषे समस्तृषि । आत्मसाम्येन भूतानि सर्वगं मां च वेत्ति यऽ ।।17।।
अर्थ- सुख, दु:ख, द्वेष, क्षुधा, तोष, तृषा, यांचे ठिकाणी जो समान असतो, तो प्राणिमात्राला व सर्वव्यापी मला खऱ्या अर्थाने जाणतो.
विवरण- प्रत्येकाच्या जीवनात सुख, दु:खाचे प्रसंग येत असतात त्याप्रमाणे ते साधकाच्या जीवनातही येतात. सामान्य मनुष्य दु:खाच्या प्रसंगी कोलमडून जातो तर सुखाच्या प्रसंगात हुरळून जातो. तसेच कठीण प्रसंगी त्याला मदत करणाऱ्याबाबत त्याला प्रेम वाटते तर जे मदत न करता नुसतीच त्यांची शोभा बघत बसतात, मदत करायच्या प्रसंगी त्याच्याकडे पाठ फिरवतात त्यांचा द्वेष करतो. त्यांच्यावर कठीण प्रसंग आला की बघून घेऊ असा विचार करतो. साधक मात्र सुखदु:खाच्या प्रसंगात स्थिर असतो.
क्रमश: