सेंटपॉल संघाची विजयी सलामी
मृदुला सामंत चषक फुटबॉल स्पर्धा : भरतेश, कनक, चिटणीस, ज्ञानप्रबोधन, एमव्हीएम, सर्वोदय सामने बरोबरीत
बेळगाव : एसकेई सोसायटी जीएसएस महाविद्यालय व बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या मृदुला सामंत आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटन दिवशी सेंटपॉल संघाने मुक्तांगण संघाचा पराभव करुन विजयी सलामी दिली. तर भरतेशने कनक मेमोरियलला, ज्ञान प्रबोधनने चिटणीसला तर सर्वोदयने एमव्हीएमला बरोबरीत रोखले. आरपीडी महाविद्यालयाच्या मैदानावर मृदुला सामंत चषक फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून एसकेई सोसायटीचे क्रीडा विभागाचे चेअरमन अनंत सराफ, पुरस्कर्ते सामंत, ज्ञानेश कलघटगी, भरत शानभाग, जीएसएस महाविद्यालयाचे प्राचार्य अरविंद हलगेकर, पदवीपूर्व महाविद्यालयाचे प्राचार्य एस. एन. देसाई, आरपीडी महाविद्यालयाचे प्राचार्य अभय पाटील, क्रीडा निर्देशक डॉ. रामकृष्ण एन., बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष पंढरी परब, उपाध्यक्ष गोपाळ खांडे, लेस्टर डिसोजा, सचिव अमित पाटील, एस. एस. नारगोडी, अल्लाबक्ष बेपारी, जॉर्ज रोड्रिग्ज, विनय नाईक, प्रशांत मनकाळे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते चेंडू लाथाडून व खेळाडूंची ओळख करुन स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला. पहिल्या सामन्यात भरतेश संघाने कनक मेमोरियल संघाचा शुन्य बरोबरीत रोखले. या सामन्यात दोन्ही संघांनी गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण त्यांना अपयश आले.
दुसऱ्या सामन्यात ज्ञानप्रबोधन संघाला जी. जी. चिटणीस संघाने 1-1 असे बरोबरीत रोखले. या सामन्यात 16 व्या मिनिटाला ज्ञानप्रबोधनच्या सुजल पाटीलने गोल करुन 1-0 ची आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात चिटणीसच्या महम्मद युजेर यांनी बरोबरीचा गोरल करुन 1-1 अशी बरोबरी साधली. त्यानंतर दोन्ही संघांनी गोल करण्यासाठी प्रयत्न केले. पण त्यांना अपयश आले. तिसऱ्या सामन्यात एम. व्ही. एम. संघाने सर्वोदय संघाला 1-1 असे बरोबरीत रोखले. सामन्याच्या तिसऱ्या मिनिटाला सर्वोदयच्या आनंद राऊत याने गोल करुन 1-0 ची आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सामन्यात एम. व्ही. एम.च्या अमन शिरोडकरच्या पासवर आर्यनसिंग रजपूतने गोल करुन 1-1 अशी बरोबरी साधत सामन्यात रंगत निर्माण केली. त्यानंतर दोन्ही संघांनी गोल करण्याच्या संधी दवडल्याने सामना बरोबरीत राहिला. चौथ्या सामन्यात सेंटपॉल संघाने मुक्तांगण संघाचा 5-0 अशी अच पराभव केला. या सामन्यात सोहम देवगेकर 22, 25, 28 मिनिटाला सलग तीन गोल करुन स्पर्धेतील हॅट्ट्रिक नोंदविली. 37 व्या मिनिटाला निकलोस फर्नांडीसने चौथा तर प्रेम रेड्डीने 41 व्या मिनिटाला पाचवा गोल करुन 5-0 ची आघाडी मिळवून दिली.
आरपीडी मैदानाचे वैभव परतले
आरपीडी मैदानावरती 20 वर्षांनंतर पुन्हा फुटबॉल स्पर्धा भरविण्यात आल्या. या मैदानावरती आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धा भरविल्या जात होत्या. त्यावेळी प्रचंड गर्दी होत होती. या मैदानावरती फुटबॉल सामने पाहण्यास फुटबॉल शौकिनांची एकच गर्दी होत होती. पण अनेक वर्षे या मैदानावरती स्पर्धा भरविल्या गेल्या नाहीत. बेळगाव जिल्हाफुटबाल संघटना व एसकेई सोसायटीने होतकरु फुटबॉलपटूंना वाव देण्यासाठी पुन्हा या मैदानावर फुटबॉल स्पर्धा भरविण्याचे ठरविल्याने या मैदानाचे पुनरवैभव परतले आहे. टर्फच्या मैदानावर खेळविल्यामुळे अनेक खेळाडू जखमी होत असल्याचे प्रकार घडत आहेत. मात्र मातीच्या मैदानावरती स्पर्धा भरविण्याल्या जात असल्याने पुन्हा खेळाडूंच्यात उत्साह निर्माण झाल्याचे दिसून आले. याचे सर्व श्रेय बीडीएफए व एसकेई सोसायटीला जाते.
मंगळवारचे सामने
- एमव्हीएम हेरवाडकर वि. शेख सेंट्रल-दुपारी 2 वाजता
- केएलई इंटरनॅशनल वि. कॅन्टोन्मेंट-दुपारी 3 वाजता
- सेंट मेरिज वि. संतमीरा-दुपारी 4 वाजता
- केएलएस वि. सेंट झेवियर्स-सायंकाळी 5 वाजता