बीसीसीआयच्या सचिवपदी सैकिया
वृत्तसंस्था / मुंबई
भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाच्या (बीसीसीआय) सचिवपदी तसेच खजिनदारपदासाठी इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. दरम्यान शनिवारी देवजित सैकिया यांनी सचिवपदासाठी आपला अर्ज बीसीसीआयकडे पाठविला आहे. त्याच प्रमाणे बीसीसीआयच्या खजिनदारपदासाठी प्रभतेज भाटीया यांनीही अर्ज केला आहे.
छत्तीसगड क्रिकेट मंडळाचे प्रभतेज भाटीया यांनी बीसीसीआयच्या रिक्त असलेल्या खजिनदारपदासाठी अर्ज पाठविला आहे. यापूर्वी हे पद आशिष शेलार यांच्याकडे होते. महाराष्ट्र शासनाचे हे आता कॅबिनेट मंत्री असल्याने त्यांना बीसीसीआयच्या खजिनदारपदाचा राजीनामा द्यावा लागला.
भारतीय क्रिकेट मंडळामध्ये देवजित सैकिया यांनी सध्या हंगामी सचिवपद भूषवित आहेत. 1 डिसेंबरपासून जय शहा यांनी आयसीसीचे अध्यक्षपद स्वीकारल्याने बीसीसीआयचे सचिवपद रिक्त झाले होते. बीसीसीआयच्या या रिक्तपदासाठी प्रवेश अर्जाची मुदत शनिवारी संपल्याने आता सैकिया आणि भाटीया या दोघांचे अर्ज दाखल झाले असल्याने या पदासाठी त्यांची निवड जवळपास निश्चित झाली आहे.