21 वर्षांनंतर सैफ अली खान आणि विद्या बालन पुन्हा एकत्र!
बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी सैफ अली खान आणि विद्या बालन तब्बल 21 वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार असल्याची चर्चा आहे. 2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘परिणीता’ या चित्रपटात या दोघांनी एकत्र काम केले होते. या चित्रपटातील सदाबहार संगीत आणि भावस्पर्शी कथेमुळे आजही तो प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. आता दिग्दर्शक रितेश बत्रा यांच्या आगामी ‘लाँग इयर्स ऑगो’ या चित्रपटात ही जोडी पुन्हा एकत्र येण्याची शक्मयता आहे.
‘द लंचबॉक्स’सारख्या गाजलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे रितेश बत्रा या नव्या चित्रपटाची धुरा सांभाळणार आहेत. हा चित्रपट 1991 च्या पार्श्वभूमीवर आधारित कौटुंबिक कॉमेडी-ड्रामा असणार असल्याचे वृत्त आहे. या चित्रपटात फ्रेंच अभिनेत्री मेलानी लॉरेंट यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिकेची चर्चा आहे. चित्रपटाची निर्मिती जिओ स्टुडिओजच्या सहकार्याने होणार असून, चित्रीकरण प्रामुख्याने मुंबईत केले जाण्याची शक्मयता आहे.
‘लाँग इयर्स ऑगो’ची कथा अशा एका कुटुंबाभोवती फिरते, ज्यातील सदस्यांनी अनेक वर्षांपासून एकमेकांशी काही महत्त्वाच्या गोष्टी मनमोकळेपणाने बोललेल्या नाहीत. कालांतराने जेव्हा त्यांना आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी शब्द शोधावे लागतात, तेव्हा नात्यांमधील गुंतागुंत आणि भावनिक संघर्ष उलगडत जातो. नातेसंबंध, संवाद आणि कौटुंबिक आठवणी यांवर आधारित ही कथा प्रेक्षकांना भावेल, अशी अपेक्षा आहे.
‘परिणीता’नंतर पुन्हा एकत्र
सैफ अली खान आणि विद्या बालन यांनी 2005 मधील ‘परिणीता’मध्ये एकत्र काम केले होते. शरतचंद्र चट्टोपाध्याय यांच्या प्रसिद्ध बंगाली कादंबरीवर आधारित या चित्रपटाला संगीत आणि अभिनयासाठी विशेष लोकप्रियता मिळाली. आता दोन दशकांहून अधिक काळानंतर ही जोडी पुन्हा एकत्र येणार असल्याच्या वृत्तामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. रितेश बत्रा यांनी ‘द लंचबॉक्स’, ‘फोटोग्राफ’ आणि ‘अवर सोल्स अॅट नाइट’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यांच्या आगामी चित्रपटात सैफ आणि विद्या यांची जोडी कोणत्या स्वरूपात दिसणार, याकडे चित्रपटप्रेमींचे लक्ष लागले आहे.
